गुजरातमधील एक ६२ वर्षीय महिलेने आत्मनिर्भर होण्याचा वास्तूपाठ घालून दिलाय. ही महिला सध्या गुजरातमध्ये चर्चाचा विषय ठरली असून यामागील कारण आहे तिने सुरु केलेला दुग्धव्यवसाय. नवलबेन दालसंगभाई चौधरी असं या महिलेचं नाव आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ही महिला वर्षाला एक कोटी रुपयांचं दूध विकते. होय हे खरं आहे. याचमुळे सध्या त्या येथील शेतकरी आणि पशुउद्योग करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
दूध विक्रीमधून एखादी ग्रामीण भागातील महिला नक्कीच उदर्निवाह होईल इतकी कमाई करु शकते. गोठा आणि गुरांची संख्या जास्त असेल तर कमाईचा आकडा वाढूही शकतो. मात्र उतार वायामध्ये डेअरी उद्योग सुरु करुन तो नफ्यात चालवणं थोडं आव्हानात्मक ठरु शकतं. असं असलं तरी नवलबेन यांनी हे आव्हान अगदी लीलया पेललं आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील नागणा गावात राहणाऱ्या नवलबेन यांच्या डेअरी उद्योगाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. नवलबेन यांनी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्तरावर धवल क्रांती केल्याचंही येथील स्थानिक सांगतात.नवलबेन यांनी २०२० सालामध्ये एक कोटी १० लाख रुपयांचा उलाढाल केलीय आणि तीही केवळ दूध विकून. त्यांचा महिन्याचा नफा हा साडेतीन लाख रुपये इतका आहे. २०१९ साली नवलबेन यांनी ८७ लाख ९५ हजारांचा व्यवसाय केला होता. यंदा त्यांनी एक कोटीचा पल्ला पार केला. नवलबेन यांनी २०१९ साली घरगृती स्तरावर दुग्धव्यवसाय सुरु केला. सुरुवातील अगदी मोजक्या गुरांच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. मात्र आज त्यांच्याकडे ८० हून जास्त म्हशी आणि ४५ गायी आहेत. त्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दूध पुरवठा करतात.नवलबेन यांना चार मुलं आहेत. मात्र माझ्या चारही मुलांची कमाई माझ्यापेक्षा भरपूर कमी असल्याचं नवलबेन सांगतात. “मला चार मुलं आहेत. चारही मुलं शहरामध्ये स्थायिक असून ते तिथे शिकतात तसेच कामही करतात. मी २०१९ ला दुग्धव्यवसाय सुरु केला असून आज माझ्या गोठ्यामध्ये ८० म्हशी आणि ४५ गायी आहेत. मी पहिल्या वर्षी ८७ लाख ९५ हजार रुपयांचं दूध विकलं. बनासकांठा जिल्ह्यात पहिल्यांदाच कोणीतरी एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाच्या माध्यमातून पैसा कमवला असेल. २०२० मध्येही मी एक कोटी १० लाखांचा व्यवसाय करुन सर्वाधिक कमाईत पहिल्या क्रमांकावर आहे,” असं नवलबेन सांगतात. मागील वर्षी अमूल कंपनीचे अधिकारी असणार आर. एस. सोढी यांनी ट्विट करुन दिलेल्या माहितीमध्ये नवलबेन या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला ठरल्या होत्या. नवलबेन यांनी २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन लाख २१ हजार ५९५ किलोंहून अधिक दूध विकलं होतं.रोज सकाळी नवलबेन या स्वत: दुभत्या गाईंची धार काढतात. मात्र गुरांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी कामाला माणसं ठेवली असून आज त्यांच्या गोठ्यात १५ कर्माचारी काम करतात.आपल्या या दुग्धव्यवसायातील यशसाठी त्यांना दोन वेळा लक्ष्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच बनासकांठा जिल्ह्यातील सर्वोत्तम पशुपालक म्हणून तीन वेळा त्यांचा सत्कार करण्यात आलाय.
प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा