Advertisement

 बीड दि.२७ (प्रतिनिधी)-:अमृत योजनेच्या कामात आलेले अडथळे,नगरपालिकेने महावितरणचे बिल न भरल्याने रखडलेला अतिरिक्त वीज भाराचा प्रश्न आणि ते कमी का काय म्हणून पाणी पुरवठा योजनेत झालेला बिघाड यामुळे बीड शहराला मागच्या २० दिवसांपासून पाणी आलेले नाही, ते नेमके कधी येणार हे देखील माहित नाही . अशा परिस्थितीत बीडकरांना खाजगी टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ आली आहे. मात्र त्यासाठी देखील बीडकरांना १६ ते २४ तास प्रतिक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
     बीड शहर हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे शहर आहे.मात्र जिल्हा मुख्यालयाच्या या शहराला सध्या भीषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. बीड शहराला नगरपालिकेद्वारे होणार पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून शहराच्या अनेक भागात मागच्या २० दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. शहराच्या पाणीपुरवठा योजनेत बिघाड झाल्याचे सांगत हा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे, मात्र त्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केल्याचे नागरिकांना दिसत नसल्याचे चित्र आहे.शहरात सध्या खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे, मात्र मागच्या आठवड्यात बया टँकरचे भाव देखील मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एक हजार लिटरच्या टँकरसाठी अडीचशे रुपये मोजावे लागत होते, आता तेव्हढ्याच पाण्यासाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे तेवढे पैसे देण्याची तयारी करून देखील पाणी वेळेवर मिळत नाही. या टँकरवाल्यांकडे साधारण १६ ते २४ तासांची  प्रतिक्षा आहे.त्यामुळे आता पैसे मोजून देखील पाणी मिळत नसेल तर सामान्यांनी करायचे काय हा प्रश्न कायम आहे.

 

उदभवाच्या ठिकाणी गर्दी
सध्या टँकर भरण्यासाठी ज्या तलावाचा किंवा खाजगी पाणी साठ्यांचा वापर होतो, ते साठे देखील आटू लागले आहेत.अनेक ठिकाणचे खाजगी बोअर बंद पडले आहेत तसेच विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत.सार्वजनिक पाणी साठ्यांजवळ मोठ्याप्रमाणावर टँकरची गर्दी होताना दिसत आहे.त्यामुळे टँकर भरण्यासाठी देखील लांबच्या लांब रंग लागत आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहकाला टँकरने पाणी पोहचविण्यास वेळ लागतो असे चित्र आहे.

 

नगरपालिकेचे टँकर कोणाच्या दिमतीला ?
बीड शहरातील पाण्याची समस्या इतकी बिकट झाल्यानंतर देखील नगरपालिका याला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. नगरपालिकेने पाणी प्रश्न बिकट झाल्यानंतर काही खाजगी टँकर लावले आहेत, मात्र या टँकरद्वारे पाणी पुरवठा कोठे करायचा याचे कसलेही नियोजन नाही. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आणि टँकरवाले कंत्राटदार यांच्या मर्जीवरचा सारा खेळ सुरु आहे. त्यामुळे टँकरवर पालिकेचा पैसे खर्च होऊन देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावीच लागत आहे.

 

बीडला रोज लागते ४ कोटी लिटर पाणी
बीड शहराची सध्याची लोकसंख्या लक्षात घेता बीड शहराला सध्या रोज ४ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. ही गरज देखील किमान पाणी वापर लक्षात घेऊन समोर आलेली आहे. त्यामुळे खाजगी टँकर तरी किती फेऱ्या मारणार आणि कुठवर पुरणार हा प्रश्न आहेच.

 

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष
बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त वीज भर मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी महावितरण अगोदर जुनी थकबाकी भरण्यासाठी आग्रही आहे तर नगरपालिका बिल भरण्याची आपली परिस्थिती नसल्याचे सांगत आहे. यासंदर्भात माजी आ. सय्यद सलीम आणि आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने नियोजन समितीच्या निधीतून किंवा विशेष बाब म्हणून शेणाच्या निधीतून ही थकबाकी भरण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याच्या सूचना सरकारला केल्या होत्या. मात्र नियोजन समितीच्या निधीतून सदरचे बिल भरले गेले नाही. आता पालकमंत्री असलेले अजित पवार 'नागरिक जर घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणार नसतील तर योजना चालवायच्या कशा ? ' अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे देखील प्रश्न अधिकच किचकट झाला आहे.

 

वर्षभरात २० वेळा देखील मिळाले नाही  पाणी
बीड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे. मात्र बीडकरांच्या घशाची कोरड कायम आहे. मागच्या दोन वर्षात बीड शहराला १५ ते २० दिवसांमधून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे वर्षातून २० वेळा देखील नागरिकांना मिळत नाही. मग अशी परिस्थिती असताना नागरिकांनी पाणीपट्टी मात्र नियमित भरली पाहिजे अशी अपेक्षा पालकमंत्री कोणत्या नैतिकतेच्या आधारे करतात हा देखील प्रश्नच आहे.

 

आ.क्षीरसागर,माजी आ.सलीम ठाण मांडून
बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. या कमला गती यावी यासाठी बीडचे आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम हे कामाच्या ठिकाणी रोज भेटी देत आहेत, त्या ठिकाणी ठाण मांडत आहेत, मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेसाठी देखील त्यांनी नगरपालिकेला आणि जिल्हा प्रशासनाला आग्रह करणे आवश्यक आहे.

 

Advertisement

Advertisement