Advertisement

पोलीस कर्मचार्‍यांसाठी मुख्यालयात साकारलाय आयसोलेशन कक्ष

प्रजापत्र | Friday, 26/06/2020
बातमी शेअर करा

कोरोनाशी लढण्याची तयारी
बीड दि.26 (प्रतिनिधी)ः कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाशी लढणे सोपे व्हावे यासाठी बीडच्या पोलीस मुख्यालयात खास पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक वेगळा आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच महिला कर्मचार्‍यांसाठी पोलीस विश्रामगृहाच्या बाजूला असाच कक्ष तयार करण्यात येणार आहे. 
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस कर्मचार्‍यांना थेट पहिल्या आघाडीवर काम करावे लागते. तपासणी नाके असतील किंवा शहरातील बंदोबस्त. अगदी रोज पोलीस ठाण्यांमध्ये कितीतरी लोकांच्या घ्याव्या लागणार्‍या भेटी त्यामुळे या कर्मचार्‍यांना कोरोनापासून वाचविण्याची जबाबदारी मोठी आहे. त्यातच कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झालाच तर इतर रूग्णालयात जाण्याची वेळ येवू नये म्हणून बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी बीडच्या पोलीस मुख्यालयात तब्बल 55 खाटांचा कोरोना कक्ष साकारला आहे. तसेच पोलीस विश्रामगृहाच्या बाजूला महिलांसाठी 36 खाटांच्या आयसोलेशन कक्षाची तयारी सुरू आहे.
बीडमध्ये तपासणी नाक्यावर पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यावेळी काही कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी रूग्णालयातच पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा होवू नये अशी भिती व्यक्त केली होती. त्यातून आपल्याला पोलीसांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष तयार करण्याची कल्पना सुचल्याचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रजापत्रशी बोलताना सांगितले. या कोरोना कक्षाचे लवकरच उद्घाटन होणार असुन लक्षणे नसणार्‍या किंवा अतीसोम्य लक्षणे असणार्‍या रूग्णांना या ठिकाणी ठेवले जाणार आहे.

Advertisement

Advertisement