राज्यात कोणतेही सरकार आले तरी शेतकरी आत्महत्यांचा आलेख खाली येत नाही हे ढळढळीत वास्तव आहे. मुळात सरकारच्या धोरणांमध्येच शेतकऱ्यांचे मरण लिहिलेले आहे. मात्र त्यात बदल करण्याऐवजी कधी शेतकरी सन्मानच्या नावाने हजार पाचशेची मलमपट्टी तर कधी कर्जमाफीच्या नावाखाली बूस्टर डोस देण्यापलीकडे सरकार काही करीत नाही आणि शेतकऱ्यांचे हित साधण्यात आलेल्या अपयशाचे खापर मात्र माणिकराव कोकाटेंसारखे उद्दाम मंत्री पुन्हा शेतकऱ्यांच्याच डोक्यावर फोडतात . शेतकऱ्यांचा संसार चालविणे काही बनावट कागदपत्रे देऊन सदनिका लाटण्याइतके सोपे आहे का ?
राज्याचे कृषिमंत्री ,तेच ज्यांना सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याच्या म्हणजे फसवणुकीच्या गुन्ह्याखाली स्थानिक न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि शिक्षेला स्थगिती दिली नाही तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल या न्यायालयीन उदारतेमुळे ज्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, ते राष्ट्रवादीचे उद्दामपणासाठी परिचित असलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भाने शेतकर्यांबद्दलच मुक्ताफळे उधळली आहेत. खरेतर माणिकराव कोकाटे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाने आणि महायुतीने निवडणुकीच्या अगोदर शेतकरी कर्जमाफीचा शब्द दिला होता. मात्र फसवणूकफेम कोकाटेंना हे सारे कशाला आठवेल, त्यासाठी संवेदना जिवंत असाव्या लागतात. आता अजित पवारांनीच शेतकरी कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. अजित पवारांनी एकदा कर्जमाफी नाही म्हटल्यावर कोकाटेंसारख्यांना तर अजित पवारांच्या मर्जीत जाण्यासाठी असेल कदाचित, पण अजित पवारांना योग्य ठरविणे भाग आहेच, म्हणून मग त्यासाठी कोकाटे थेट राज्यातील शेतकऱ्यांवरच बरसले आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा पैसा संसार चालविण्यासाठी, लेकरांची लग्न करण्यासाठी वापरला असा कोकाटेंचा आरोप आहे. कर्जमाफीतून काही रक्कम मिळाली तर त्याचा विनियोग कसा करायचा हा सर्वस्वी त्या शेतकऱ्याचा विषय, त्यात नाक खुपसण्याचे कोकाटेंना मुळातच कामच काय ?
माणिकराव कोकाटे भलेही राज्याचे कृषिमंत्री झाले असतील, पण त्यांचा शेतकऱ्यांच्या वेदनांशी कधी संबंध आल्याचे पाहायला , ऐकायला मिळाले नाही. कोकाटेंना नाशिकचे पालकमंत्रिपद हवे होते, त्यासाठीचा त्यांचा अट्टाहास साऱ्या राज्याने पाहिला, पण त्याच नाशिकमधील कांदाउत्पादकांसाठी कोकाटे कधी बोलल्याचे फारसे ऐकिवात नाही. यावरूनच त्यांचे शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. मुळातच शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे जणू काही शेतकऱ्यांवर फार मोठे उपकार आहेत अशीच भावना राज्यकर्त्यांची झालेली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला जबाबदार कोण आहेत? सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर किती परिणाम होतो ? सरकारचे धोरणच शेतकऱ्यांचे सरण कसे बनत आहे ? जीवनावश्यक वस्तू कायदा असेल किंवा भूमिअधिग्रहण , आणि असेच १०- १२ कायदे शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास कसा बनत आहेत हे महाराष्ट्रात किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यमातून अनेकदा ओरडून सांगितले जात आहे, मात्र केंद्रातल्या किंवा राज्यतल्या सत्ताधाऱ्यांना हे ऐकू येत नाही. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची होणारी फरफट राज्यकर्त्यांना दिसत नाही. हमीभावाच्या नावाने होत असलेली थट्टा , नावाला खरेदी केंद्रे उघडायची, पण तेथेही वेगवेगळ्या कारणांवरून शेतकऱ्यांची अडवणूक करायची यावर कृषी मंत्री कोकाटे कधी काही बोलले नाहीत . सोन्यासारख्या जमिनी ज्या शेतकऱ्यांनी सार्वजनिक प्रकल्पांसाठी दिल्या त्यांना १०-२० वर्ष देखील मावेजा मिळत नाही, त्यांच्या मावेजा मागणीच्या संचिका मंत्रालयात कोणीतरी येऊन 'टक्का ' देईल यासाठी धूळखात पडल्या आहेत , त्याची सरकार म्हणून काही लाज राज्याच्या कृषिमंत्र्यांना वाटणार आहे का ? मावेजासाठी शेतकऱ्यांना न्यायालयाचे खेटे घालावे लागतात आणि पर्यायी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिवाणी अटकेची वेळ येते , तरीही निगरगट्ट सरकार हलत नाही, याबद्दल कोकाटेंचे काय म्हणणे आहे ?
मुळातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य आणि हमी भाव, त्याच्या विक्रीसाठी विपणन साखळी, त्याच्या शेतीला शास्वत सिंचनाची सोय , किफायशीर दरात निविष्ठा आणि सुरळीत पतपुरवठा या किमान गोष्टी देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले तर शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. त्याच्या हातात चार पैसे उत्पन्नातून राहिले तर त्याला रोजचा संसार चविण्यासाठी कर्ज काढण्याची आणि कोकाटेंना वाटते तसे कर्ज माफीचा पैसे वापरण्याची वेळ कशाला येईल ? बरे आज ज्या शेतकऱ्यांनी कर्ज माफीचा पैसा संसार चालविण्यासाठी वापरला असे कोकाटेंना वाटते , ते कोकाटे कधी उद्योगपतींना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीवर , त्यांनी हा पैसे कशावर उडविला असा प्रश्न विचारण्याची हिम्मत करतील का ? सरकारमधील आणि बाहेरील सहकार सम्राटांना मिळालेला पैसा नेमका कोठे वापरला जातो असा प्रश्न विचारण्याची हिम्मत माणिकराव कोकाटेंमध्ये आहे का ? हे सारे सोडून राज्यातल्या शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा असंवेदनशील उद्दामपणा कोकाटे का करीत आहेत ?