अंबाजोगाई दि.१९ (प्रतिनिधी) : आत्महत्याग्रस्त(Ambajogai) शेतकर्यांच्या विधवा पत्नी व त्यांच्या कुटूंबियांना न्याय देण्यात यावा. (Farmer)त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासाठी बुधवार (दि.१९) रोजी विधवा महिलांचा मोठा मोर्चा राजीव गांधी चौकापासून निघाला.आंदोलक महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व आधार माणूसकीचा संस्थेचे अध्यक्ष अॅड.संतोष पवार यांनी केले. मोर्चात शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट,किसानपुत्र आंदोलनाचे सुदर्शन रापतवार, अचूत गंगणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्नत्याग आंदोलन शेतकरी सहवेदना दिनानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या विधवा पत्नी व महिलांचा मुक मोर्चा बुधवारी दुपारी १२ वाजता राजीव गांधी चौकातून निघाला. हा मोर्चा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनात प्रत्येक आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबाला २५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे. कुटूंबातील विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात यावे. या कुटूंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विनातारण कर्ज तात्काळ मिळावे. या कुटूंबाला दैनंदिन उपजिविकेसाठी प्रति महा दहा हजार रूपये अनुदान द्यावे., प्रत्येक कुटूंबाला घरकुल व शौचालय योजनेचा लाभ द्यावा. प्रत्येक एकल पालक कुटूंबातील मुलांना सरसकट बालसंगोपन योजनेचा लाभ द्यावा. मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय वसतीगृहात प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा. शेती गृह उद्योगासाठी तात्काळ कर्ज पुरवठा केला जावा, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वाढविण्यात यावे., शासनाच्या सर्व योजनांचा लाभ या कुटूंबाला मिळावा, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या सर्व महिलांनी आज शेतकरी सहवेदना दिनानिमित्त उपवास धरून तळपत्या उन्हात मुक मोर्चा काढला. या मुकमोर्चात महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.