Advertisement

व्यायामशाळेच्या नावावर तीन ते पाच लाखाची खिरापत;७२ गावातील लोकहो कामाकडे लक्ष राहू द्या

प्रजापत्र | Thursday, 25/06/2020
बातमी शेअर करा

बीड-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे महत्वाच्या विकास योजनांसाठी निधी अपूरा असतानाच ‘2515’च्या हेडखाली खुल्या व्यायामशाळेच्या नावाखाली तीन ते पाच लाखाची खिरापत वाटण्याची तयारी सुरु झाली आहे. बीड आणि शिरुर तालुक्यात तब्बल 72 गावांमध्ये खुली व्यायामशाळा तयार करण्यासाठी तीन ते पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य अडचणीत असताना हा जो निधी व्यायाम शाळेसाठी दिला जात आहे त्यातून खर्‍या अर्थाने व्यायामशाळा उभी रहावे निव्वळ दोन डबलबार उभारुन हा निधी हडपला जाऊ नये याकडे गावकर्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

राज्यात सध्या विविध विकास योजनांचा निधी कपात केला जात आहे. मात्र असे असले तरी ग्रामविकास विभागाच्या ‘2515’ हेडखाली दिल्या जाणार्‍या विकास योजनांना सरकारने कात्री लावलेली नाही. बीड जिल्ह्यात या हेडखाली कोट्यावधीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत या हेडखाली रस्ते आणि नाल्या केल्या जायच्या. मागच्या दोन तीन वर्षात सौर पथदिवे या घटकाचा समावेश यात करण्यात आला. मात्र कोट्यावधींचे पथदिवे बसविल्यानंतरही गावे अंधारातच आहेत. 
असे असतानाच आता खुली व्यायामशाळा हा नवा प्रकार यात आणण्यात आला असून खुल्या व्यायामशाळेच्या उभारणीच्या नावावर तीन ते पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. बीड आणि शिरुर तालुक्यातील तब्बल 72 गावांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याने आता त्यातून खर्‍या अर्थाने व्यायामशाळा उभारेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दहा वीस हजाराचे डबलबार आणि पाच पंचवीस हजाराचे डंबेल्स ठेवून हा लाखोंचा निधी कोणी घशात घालू नये यासाठी गावकर्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

या गावांमध्ये उभारणार  खुल्या व्यायामशाळा
बोरखेड, रौळसगाव, कानडीघाट, गोलंग्री, देविबाभळगाव, चांदेगाव, पालसिंगण, खडकीघाट, बोरखेड, पिंपरगव्हाण, हिंगणीखुर्द, मानेवाडी, लोणीघाट, वाढवणा, पिंपळगाव घाट, रुईगव्हाण, जेबापिंप्री, नाळवंडी, लक्ष्मीआई तांडा, मसेवाडी, पिंपळगाव मजरा, कामखेडा, जुजगव्हाण, घाटसावळी, मौज, शिवणी, पिंपळगाव मोची, वरवटी, कुटेवाडी, इमामपूर, आहेरवडगांव, पाली, मंजरी हवेली, मुळूकवाडी, वलीपूर, बहीरवाडी, दगडी शहाजानपूर, नवगण राजुरी, चौसाळा, फुलसांगवी, कमळेश्‍वर धानोरा, साक्षाळपिंप्री, आर्वी, उमरद जहांगीर, नागापूर खुर्द, नागापूर बूद्रुक, बहाद्दरपूर, सोनगाव, बेलवाडी, ईट, उमरी, खांडे पारगाव, उमरद, काळेगाव हवेली, दहिफळ, तळेगाव, बेलुरा, रायमोहा, हिवरसिंगा, काटवटवाडी, सांगळेवाडी, वंजारवाडी, बरगवाडी, धनगरवाडी, आनंदवाडी, शिरापुर धुमाळ, काकडहिरा, वानगाव, साखरेबोरगाव, म्हाळसापूर.

 

 

Advertisement

Advertisement