बीड दि. १२ (प्रतिनिधी ) : बीडमधल्या 'विलासी ' 'उदा'र 'वंता'ने सोन्याच्या नावाने (Gold scam) भलतेच काही तरी देऊन बीडमधील हजारोंना फसविले असल्याचे आता समोर येत आहे. त्याने गंडा घालतलेल्या लोकांची संख्या फार मोठी असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मागच्या काही वर्षात या 'विलासी ' 'उदा'र 'वंता'चा मोठ्याप्रमाणावर उत्कर्ष (milionear) झाला. अगदी रंकाचा राव झाला म्हणावा तशी परिस्थिती झाली, मात्र त्याने स्वतःला मोठे होण्यासाठी अनेकांना देशोधडीला लावले असून अनेकांना गाव सोडून जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये या 'विलासी ' 'उदा'र 'वंता'बद्दल 'रंकाचा झाला राव आणि आता शोधतेय सारा गाव ' अशी चर्चा सुरु आहे.
बीड शहरातील एका 'विलासी ' 'उदा'र 'वंता'ने केलेला सोने घोटाळा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्याने बीडमध्ये एक सोने कारागीर म्हणून सुरुवात केली होती, मात्र मागच्या काही वर्षात त्याची सर्वत्र मोठी भरभराट झाली. कोणालाही आपली प्रगती साधण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्या उत्कर्षाबद्दल कोणाला काही वाटण्याचे कारण नाही, मात्र हा उत्कर्ष करताना त्याने अनेकांना गंडा घातला आहे. त्याने बीडकरांना केवळ सोन्यामध्येच फसविले नाही , तर त्याच्या 'भिश्या'मध्ये देखील अनेकजण अडकले असल्याचे आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्याच्या अनेक ठिकाणी भिश्या होत्या, तो स्वतः भिशी चालक देखील होता असे सांगितले जाते, त्यामुळे आता त्याच्या भिश्यामध्ये ज्यांनी पैसे गुंतविले ते देखील हैराण झाले आहेत.
बीडमधील सुवर्ण घोटाळ्याचे ( Gold scam) या पुर्वीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा
भाग १
https://prajapatra.com/11913
भाग २
https://prajapatra.com/11919
मागच्या काळात याच साऱ्या धंद्यांमधून त्याने मोठ्याप्रमाणावर माया जमविली, चल , अचल संपत्ती जमविल्याचे देखील सांगितले जाते. त्याच्याच व्यवसायातील अनेकांना आपली हयात गेली तरी इतका फायदा होत नाही , याची मात्र भरभराट कशी होते याचे कोडे पडलेले असायचे. आता त्याच्या उत्कर्षाचे कोडे सुटले असून रंकाचा राव झालेल्या या 'विलासी ' 'उदा'र 'वंता'चा शोध आता फसवणूक झालेले सारेच लोक आपापल्यापरीने घेत आहेत .
---
वित्तीय संस्था लागल्या कर्जदारांच्या मागे
या 'विलासी ' 'उदा'र 'वंता'च्या प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमधून सुवर्ण कर्ज काढले आहे. बीडमधील किमान ४-५ वित्तीय संस्थांच्या पॅनलवर हा विलासी ' 'उदा'र 'वंत'होता. अनेक ठिकाणी त्यानेच इतरांच्या नावे हे गोल्डलों केल्याचे सांगितले जाते. आता मात्र या साऱ्याच वित्तीय संस्था जाग्या झाल्या आहेत. ज्यांचे ज्यांचे तारण म्हणून दिलेले सोने संशयास्पद आहे, त्यांना बोलावून वित्तीय संस्थांकडून तातडीने कर्ज भरा नाहीतर गुन्हे दाखल करू अशी तंबी दिली जात आहे. आता स्वतःची मान वाचविण्यासाठी या बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांच्या मानगुटीवर बसने सुरु केले आहे. आणि कर्जदारांची अवस्था 'खाया पिया कुछ नही, ग्लास फोडा बाराना ' अशी झाली आहे.