रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी आठवडाभरापूर्वी दावा केलेले कोरोनावरील औषध मंगळवारी(दि.23 जून) घेलेल्या पत्रकार परिषदेत सादर केले.
रामदेव बाबांच्या दाव्याची आयुष मंत्रालयाने गंभीर नोंद घेतली असून, या औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.
तसेच या औषधांचे संशोधन तपासण्याबाबत नोटीसही कंपनीला देण्यात आली आहे. अशाप्रकारची औषधं शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात करणं हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज 1954 या कायद्याचा भंग आहे. तसंच, कोव्हिड-19 उद्रेकानंतर केंद्र सरकारने जाहिर केलेल्या नियमांचाही भंग केल्याचे सांगितले आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीकडून या औषधांची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचं संशोधन, किती रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, CTRI ने याची काय नोंद केली आणि कोणत्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले याबाबतची विस्तृत माहिती आयुष मंत्रालयाने मागविली आहे.
कोरोनिल आणि श्वासारी ही औषधे शोधल्याचे रामदेव बाबांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, "कोरोनावर आम्ही औषधं शोधून काढली असून ही औषधं 100 टक्के यशस्वी झाल्याचं निष्पन्न झालं आहे."
परंतु तज्ज्ञांच्या मते अश्वगंधा, गुळवेल(गिलोय) या आयुर्वेदीय औषधांनी मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती(इम्युनिटी) नक्की वाढते परंतु याचा अर्थ या किंवा यापासून बनवलेल्या औषधांनी कोरोनाचा(Covid-19) विषाणू नष्ट होतो किंवा कोविड बरा होतो असे नाही. या औषधांनी कोरोना बरा होण्याला आजतरी कोणतेही शास्त्रीय पुरावे सादर केलेले नाहीत.
रामदेव बाबांच्या कोरोनिल व श्वासारी या औषधांना FDA ची परवानगी आहे की नाही याबाबत देखील प्रश्नचिन्ह कायम आहे.
मात्र येणाऱ्या 3-4 दिवसांत याबाबत सर्व पुरावे, क्लिनिकल ट्रायल चे परिणाम जगापुढे ठेऊ असे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले.