Advertisement

विशेष संपादकीय- गढूळलेले वातावरण निवळा

प्रजापत्र | Thursday, 30/01/2025
बातमी शेअर करा

पालकत्व, मग ते व्यक्तीचे असेल, संस्थेचे असेल किंवा जिल्ह्याचे , ती मोठी जबाबदारी असते. व्यक्तिमत्वाचा, जिल्ह्याचा विकास करणे आणि त्यातून नवनिर्माण करणे म्हणजे पालकत्व असे आम्ही मानतो. म्हणूनच आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून येत असलेल्या अजित पवारांकडून (Beed)बीड जिल्ह्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. जिल्ह्याचा यापूर्वी बाहेरच्या पालकमंत्र्यांचा अनुभव फारसा लक्षात ठेवावा असा नाही, मात्र राज्याच्या राजकारणात अजित पवार प्रत्येक गोष्टीला अपवाद राहिलेले आहेत. त्यातच फार मोठ्या सामाजिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे बीडचे पालकत्व आले आहे.  मागच्या काळत बीडचे राजकीय, सामाजिक वातावरण पूर्णतः गढूळले आहे. जणू काही या जिल्ह्यात केवळ गाळ आणि चिखलच आहे का काय असे राज्याला वाटावे असे बीडचे चित्र रंगवविण्यात आले आहे. ते चित्र बदलण्यासाठी आता अजित पवारांनीच तुरटी फिरविण्याची आवश्यकता आहे. जे जे काही चुकीचे आहे, जे जे कोणी चुकीचे आहेत, तो गाळ तळाला बसवा, त्याला काढून फेक, पण जिल्ह्याचे गढूळलेले वातावरण निवला. जिल्ह्याची प्रतिमा असेल किंवा कोणतेही नेतृत्व , ते एका रात्रीत तयार होत नसते, त्यासाठी अनेक वर्षाचा संघर्ष असतो, त्यामुळे कोणत्याही राजकारणातून जिल्ह्याच्या प्रतिमेला, जिल्ह्यातील नेतृत्वाला विनाकारण धक्के लागू नयेत हे आज (Ajit pawar) अजित पवारांनी पालकत्वाच्या भूमिकेतून सांगणे आवश्यक आहे.
 
बीड(Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. तसे बीड जिल्ह्यात बाहरेच्या पालकमंत्र्यांच्या प्रयोग यापूर्वी देखील झालेला आहे, नाही असे नाही, मात्र तो प्रयोग झाला होता तो पक्षाच्या अंतर्गत राजकारणातून . आणि तेव्हा जे जे म्हणून पालकमंत्री झाले, त्यांची जबादारी केवळ झेंडावंदन आणि नियोजनसमितीची बैठक इतकीच राहिलेली जिल्ह्याने अनुभवले आहे. मात्र अजित पवार या साऱ्याला अपवाद ठरतील असा विश्वास सर्वांनाच आहे. कारण राज्यात अनेक गोष्टींना अपवाद म्हणूनच अजित पवारांची ओळख झालेली आहे.
आज अजित पवार बीड जिल्ह्यात येत आहेत. ते याठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. मात्र आज  जिल्ह्याच्या केवळ आर्थिक नियोजनावर भागणार नाही, तर एक पालक म्हणून जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी देखील त्यांनी आवश्यक आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा राज्यात रोजच चर्चेत आहे. मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हत्याकांडातील जे जे म्हणून कोणी दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर, अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही जिल्ह्याची जनभावना आहे. मात्र मागच्या काळात या हत्याकांडाच्या आधारे जिल्ह्याचे जे चित्र राज्यात रंगविले गेले आहे, ते मात्र पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्रासदायक आहे. बीड जिल्ह्यात सगळे वाईटच घडते हे ठसविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. या प्रतिमेला छेद देण्यासाठी अजित पवारांनीच काहीतरी भूमिका घेणे आवश्यक आहे.
बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील अनेक घोटाळ्यांचे गौप्यस्फोट केले आहेत. जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस दल यासंदर्भाने अनेक आरोप केले आहेत. अनेक घोटाळ्यांच्या तक्रारी केल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत, त्याची चौकशी व्हायलाच हवी. केवळ एकाच लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची नव्हे, तर जिल्ह्यात उभे आडवे , सगळीकडे जे जे काही चुकीचे घडले आहे, त्या सर्वांचीच एकदाची चौकशी करायला कोणाची हरकत नसावी. ज्यांनी ज्यांनी , जे जे काही चुकीचे केले असेल, ते त्यांनी भोगावे, पण त्याची शिक्षा संपूर्ण जिल्ह्याला कशाला ? फक्त या साऱ्या घोटाळ्यांचा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायाशी काहीच संबंध नाही, या घोटाळ्यांची चौकशी म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय असे जे गृहीतक लावले जात आहे., ते चुकीचे आहे हे देखील ठासून सांगण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या प्रशासनात, पोलिसात, जिल्हापरिषदेत, कोणत्याही विभागात , जे अधिकारी, कर्मचारी आहेत, ते काही अपवाद वगळता कोणाचे ना कोणाचे तरी डावे उजवे हात आहेतच , त्यामुळे कोणा एकाच्या मर्जीतले कर्मचारी आहेत असेही काही नाही , अशा सर्वांच्याच, सर्वच डाव्या उजव्यांना जागा दाखवायलाही काही हरकत नाही, अगदी जिल्हाभर मोठी उलथापालथ घडवविणायची हिम्मत दाखविली तरी त्याचेही स्वागतच .
पण हे सारे करताना जिल्ह्याच्या प्रतिमेचे काय ? बीड जिल्ह्यात सारे काही वाईट आणि इथले नेतृत्व देखील वाईट असे जे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे, ते आवरावे लागेल. आरोप प्रत्यारोपांची जी राळ मागच्या काही काळात उडाली आहे, त्याचे शिंतोडे अनेकांच्या अंगावर जात आहेत. आणखी काही काळ हे असेच सुरु राहिले तर बहुतांश पुढाऱ्यांच्या अंगावर कोणता ना कोणता शिंतोडा उडेलच. त्यातले किती खरे किती खोटे , न्यायालयाच्या पटलावर, चौकशीच्या फेऱ्यात त्यातील किती गोष्टी सिद्ध होतील, माहित नाही, पण या साऱ्यामुळे आज जिल्ह्याची आणि जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिमा काळवंडली जात आहे ते पालक म्हणून थांबविण्याची भूमिका आणि त्यासाठी कृती अजित पवारांनी करावी अशी अपेक्षा आहे.
नेतृत्व मग ते कोणतेही असो, ते एका रात्रीत घडत नसते, त्यासाठी मोठा संघर्ष असतो. आरोपांच्या वावटळीमुळे  राजकीय आयुष्याला धक्का बसल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत. स्वतः अजित पवारांनाही अनेकदा आरोपांच्या वावटळींचा सामना करावा लागेल आहेच. या वावटळींमुळे कोणाच्याही राजकीय, सामाजिक जीवनाला धक्का बसल्यास त्याची भरपाई नंतर कोणत्याही चौकशीतून निर्दोष सिद्ध झाल्याने होऊ शकत नाही. कोणत्याही भागातील एखादे नेतृत्व राजकीय परिघाआड जाण्याचे परिणाम पुढे त्या भागाला अनेक वर्ष भोगावे लागतात . अजित पवारांना याची जाण आहेच. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात जे काही घडत आहे, जिल्ह्याच्या संदर्भाने राज्यात जे काही घडत आहे, त्यावर एक पालक म्हणून अजित पवारांनी उचित भूमिका घेणे आवश्यक आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्या न्यायाच्या बाबतीत कोणतीच तडजोड नको, जे चुकीचे वागले असतील, वागत असतील, त्यांनाही दयामाया दाखविण्याची आवश्यकता नाही, मात्र केवळ आरोपांच्या वावटळीत जिल्ह्याच्या प्रतिमेचे आणि जिल्ह्यातील नेत्यांचे राजकीय सामाजिक जीवन देखील विस्कटायला नको, ते सारे सावरण्याची जबादारी आता अजित पवारांची आहे.

 

Advertisement

Advertisement