बीड: बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या (Beed DPC) बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री (ajit pawar)अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून (Vijasinh pandit) आ.विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून (Namita mundada)आ.नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या विधानमंडळ सदस्यांना हा धक्का मानला जात आहे.
इतर आमदारांचे काय?
जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष असतात. तर शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातून काही जागा निवडणूकिने भरल्या जातात. समितीवर विधानमंडळ सदस्यांमधून दोन सदस्य तर नियोजनाचा अभ्यास असलेले १२ सदस्य नामनिर्देशित केले जातात. यांना समितीचे सदस्य म्हणून सर्व अधिकार असतात. (Beed) जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार) हे नियोजन समितीच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रित असतात. मात्र ते समितीचे सदस्य नसतात. मतदानाची वेळ आली तर विशेष निमंत्रितांना त्यात सहभागी होता येत नाही, नामनिर्देशित सदस्य मात्र सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे नामनिर्देशित विधानमंडळ सदस्यांचे नियोजन समितीत वजन काहिसे अधिक वाढलेले असते.