स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, असे सांगतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री (Ajit pawar)अजितदादा पवार यांनी केले.
सुमारे ५० गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्याराष्ट्रवादी (Ncp)काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. शिबीरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल, असा विचार मांडला होता त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.
आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळाले आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पक्षाचे कार्यकर्ते कामात सक्रीय ठेवले पाहिजे त्या पद्धतीने पक्षाकडून कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहे. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत हेही जाणून घेत असतो, असे अजित पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले. तर, तुम्ही ज्या ताकदीने पक्षप्रवेश करत आहात त्याने आमच्या पक्षाची ताकद अजून वाढणार असून, आता आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांना सांगितले.