पालकमंत्र्यांच्या नेमणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. विश्वासात न घेता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय घेण्यात आल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे थेट दरे या आपल्या मूळ गावी पोहोचले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री (Girish Mahajan) गिरीश महाजन दरे इथं जाणार असल्याचे समजते.
नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे नेते आणि (Dada bhuse(मंत्री दादा भुसे यांना तर रायगडचे पालकमंत्रिपद (Bharatshet Gogawale) भरत गोगावले यांना मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपने आपल्याकडे घेत रायगडमध्येही राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदाबाबत भ्रमनिरास झाल्याने दुखावलेले एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या नाराजीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.