Advertisement

ऑनलाइन गेममधील पैशांच्या वादातून मावसभावाने केला गेम 

प्रजापत्र | Saturday, 18/01/2025
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : दोघे मावसभाऊ दोघेही एकाच खोलीत राहायचे दोघांनाही (online game) ऑनलाइन गेम खेळण्याची सवय यात एकाने लाखभर रुपये जिंकले. त्याच खात्यातून दुसऱ्याने ५० हजार गेममध्ये गमावले याचा दुसऱ्या भावाला राग आला यातून त्याने चाकूने सपासप वार करून मावसभावाला संपविले! एवढे करून तो थांबला नाही, तर त्याने अगदी ‘क्राइम सीन’सारखा ‘सीन’ तयार केला आणि चक्क पतंग उडवायला निघूनही गेला! उस्मानपुरा येथे घडलेल्या प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९, रा. फ्लॅट क्रमांक ४९, म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा) याच्या (crime) खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना (police) यश आले आहे.

 

 

प्रदीपच्या साडेसतरा वर्षीय मावस भावानेच ऑनलाइन गेमच्या पैशाच्या वादातून त्याचा चाकूने भोसकून निर्घृन खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला. भावाचा शांत चित्ताने खून केल्यानंतर आरोपी नंतर सक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यासाठी निघून गेला होता. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.उपायुक्त बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप निपटे हा मित्रांसह किरायाने म्हाडा कॉलनी भागात राहत होता. १४ जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सहा ते साडेनऊच्या दरम्यान तो एकटा असल्याची संधी साधत धारदार शस्त्राने त्याच्यावर सतरा वार करीत खून करण्यात आला होता. कोणताही पुरावा नसल्याने या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती.या पथकांनी रूममधील सहकाऱ्यांची चौकशी केली असता त्यांना त्याच्या मावसभावावर संशय आला. या मावसभावाला आणि प्रदीपला (online game)ऑनलाइन ‘ऐव्हर्ट’ नावाचा गेम खेळण्याची सवय होती. या गेममध्ये आरोपी मावसभावाने सुमारे एक लाखावर रक्कम जिंकली होती. मात्र, प्रदीप हा त्यापैकी ५० हजार रुपये रक्कम याच गेममध्ये हरला होता. यातीलच ६५ हजार रुपयांवरून देखील दोघांत वाद सुरू होता.

 

करीत होता पोलिसांची दिशाभूल
संशयित आरोपी मावसभावाला पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावले होते. त्यावेळी तो वेळोवेळी प्रदीपचे कॉलर उडवण्यावरून कॉलेजमध्ये भांडण झाल्याचे सांगत त्यांनीच खून केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी देखील त्या दिशेने तपास सुरू केला. मात्र, मावसभाऊ वारंवार त्याचे जबाब बदलत असल्याने पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.

 

 

सहा पथकांनी केला तपास
उपायुक्त बगाटे यांनी या खुनाच्या तपासासाठी सहा पथकांची स्थापना केली होती. यामध्ये कोणताही पुरावा नसताना या पथकांनी बारकाईने तपास केला. यामध्ये उस्मानपुरा, गुन्हे शाखा, सातारा, सिडको, मुकुंदवाडी आणि सिडको (midc)एमआयडीसीच्या विशेष पथकातील अधिकारी अंमलदारांचा समावेश होता. गुन्ह्याची उकल पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे, उपनिरीक्षक गोरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, एमआयडीसी सिडकोचे उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, मुकुंदवाडीचे उपनिरीक्षक संतोष राऊत, साताऱ्याचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, सिडकोचे सुभाष शेवाळे आदींच्या पथकाने केली.

 

आरोपी करत होता ‘एनडीए’ची तयारी
संशयित आरोपी हा मूळचा बोरदेवी, पो. वडवणी. जि. (beed)बीड येथील रहिवासी असून सध्या म्हाडा कॉलनीमध्ये प्रदीपसोबत राहत होता. दहावीनंतर एनडीएची तयारी करण्यासाठी तो शहरात आला होता. त्याचे वडील शेतकरी आणि ऊसतोड कामगार आहेत
.

 

 

‘मिस यू भाऊ’ म्हणून (instagram)इन्स्टावर ठेवले स्टेटस
प्रदीपचा खून केल्यानंतर मावसभाऊ हा (police)पोलिसांसोबत घाटीतील शवविच्छेदनगृहात आला होता. तो भाऊ वारल्याचे दु:ख म्हणून सर्वांसमोर रडत होता. विशेष म्हणजे, त्याने मोबाइलवर भावाचे ‘मिस यू’ म्हणून स्टेटस देखील २४ तासांपूर्वी ठेवले होते.

 

 

मृतदेहाशेजारी खेळत होता मोबाइलवर गेम
संक्रांतीच्या दिवशी प्रदीपचे दोन सहकारी झेरॉक्स काढण्यासाठी रूमबाहेर गेले होते. यावेळी मावसभाऊ आणि प्रदीप रूममध्ये दोघेच होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने मावसभावाने चाकूने प्रदीपवर प्राणघातक हल्ला करीत त्याला संपवले. प्रदीपचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने त्याला व्यवस्थित गादीवर झोपवून अंगावर पांघरूण टाकत प्रदीप झोपल्याचा बनाव केला.यानंतर आरोपी काही वेळ प्रदीपच्याच मृतदेहाशेजारी मोबाइलवर गेम खेळत बसला. त्याचे बाहेर गेलेले सहकारी आल्यानंतर आरोपी पतंग उडवण्यासाठी निघून गेला. रात्री प्रदीपचा खून झाल्याचे या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे मारेकरी अल्पवयीन मावसभावाला सज्ञान समजावे यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याची माहिती देखील बगाटे यांनी दिली. पत्रकार परिषदेला एसीपी रणजित पाटील यांची उपस्थिती होती. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पीएसआय अमित गोरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Advertisement

Advertisement