नांदेडमधील बिलोलीमध्ये शेतकरी पिता-पुत्राने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पित्याने शालेय साहित्य आणि मोबाईल घेऊ न दिल्याने मुलाने आत्महत्या केली याचा धक्का बसल्याने पित्यानेही त्याच जागी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीनुसार, अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतरही वडिलांनी मोबाईल दिला नाही. १७ वर्षांच्या मुलाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमुळे वडिलांना हादरा बसला. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून पित्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथे घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय ४३) व ओमकार राजेंद्र पैलवार (१७) असे आत्महत्या केलेल्या मृत पिता-पुत्राचे नावे आहेत. पिता पुत्राच्या या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबीय आणि मिनकी गावावर शोककळा पसरली आहे.
मिनकी येथील राजू लक्ष्मण पैलवार हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. त्यांचा ओमकार राजू पैलवार हा मुलगा अकरावीमध्ये शिकत होता. मुलगा ओमकार हा संक्रांतीनिमित्त गावाकडे आला होता. त्याने ८ जानेवारीला वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्य तसेच नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पैशांची मागणी केली. परंतु वडिलांनी त्यांना पैसे नाहीत, थोडे दिवस थांब, नंतर घेऊन देतो, असे सांगितले. त्यामुळे मुलगा नाराज झाला. वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने बुधवारी रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलगा घरी नसल्याचे पाहून वडील राजेंद्र पैलवार गुरुवारी सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले. तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. ते पाहताच वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी सुद्धा मुलाने ज्या दोरखंडाने गळफास घेतला होता तो दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले.