मुंबई- कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांकडून १३० कोटी महावितरणने वसूल केले आहेत. तसेच ९३ हजार ८४८ ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून ५९ कोटींचे व्याज व दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत मिळाली आहे.
वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वीजग्राहकांची वीजजोडणी महावितरणकडून कायमस्वरूपी खंडित केली जाते. अशा ग्राहकांकडे दहा हजार कोटींची थकबाकी आहे. त्यांच्या वसुलीसाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे.एक सप्टेंबरपासून लागू केलेल्या या योजनेअंतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत ९३ हजारहून अधिक ग्राहकांनी लाभ घेत १३० कोटींचा भरणा केला आहे, तर त्यांना ५७ कोटी ३६ लाखांचे व्याज व दोन कोटी १२ लाखांचा विलंब आकार माफ झाला आहे.या योजनेनुसार घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के, तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत देण्यात आली आहे.
थकबाकीचा भार जागामालकावर
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदाराने वीजबिलाची थकबाकी भरणे बंधनकारक आहे. तसे केले नाही, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.