यश मिळवायचे असेल तर सातत्याने प्रयत्न करावे लागतात ते सोडून चालत नाही आणि हे प्रयत्न करतानाच गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागते हे करता आले तर यश कुठे जात नाही. माझ्या आजपर्यंतच्या कामाचा तो अनुभव आहे असे सांगत शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात ओळख निर्माण केलेल्या दीपक घुमरे यांनी आपल्या यशाचा मार्ग प्रजापत्रला सांगितला.
मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा....
प्रश्न-शिक्षण क्षेत्रात काम करण्यामागची प्रेरणा काय होती?
दीपक घुमरे-माझे वडील द.बा.घुमरे(तात्या) हे शिक्षक चळवळीत अग्रभागी होते हे तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे शिक्षणाचा विषय हा घरातूनच आलेला. अगदी लहानपणापासून घरात कायम शिक्षण, शिक्षक, त्यांच्या अडचणी यावर चर्चा व्हायची. म्हणूनच आपण स्पर्धेच्या काळात काहीतरी वेगळं दिलं पाहिजे या भावनेतून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय झाला. तात्यांचाही सामान्यांची पोरं शिकली पाहिजेत, गरीबांच्या पोरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे हा आग्रह असायचा त्यामुळे देखील या क्षेत्रात आम्ही काम करत आहोत.
प्रश्न-विनाअनुदान धोरणात संस्था उभारताना काही धोका वाटत नव्हता का?
दीपक घुमरे-स्पर्धा आणि धोका सर्वत्र असतो. असे कोणतेच क्षेत्र नाही,जिथे स्पर्धा नाही पण या स्पर्धेतही टिकणं गरजेचं असतं. आपण वेगळेपण देवू शकलो तर यात टिकू हा विश्वास होता आणि त्याच विश्वासावर आम्ही नवीन तंत्रज्ञान, नवीन उपक्रम, शिक्षक प्रशिक्षण आदी माध्यमातून वेगळेपण देत आलो आहोत.
प्रश्न-विनाअनुदानच्या संस्था उभारताना नेमकी कोणती
आव्हानं होती?
दीपक घुमरे-1981 पर्यंत राज्यात अनुदान तत्वावर शाळा दिल्या जायच्या. नंतर मात्र धोरण बदलत गेलं. 1984 ला विनाअनुदान धोरण आलं. तरीही त्यावेळी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जायचे. नंतर मात्र सरकारने कायम विनाअनुदान धोरण सुरू केलं. तिथूनच अडचणी येत गेल्या. दहा-बारा वर्ष सरकारची मदत नसताना शाळा चालवणं सोपं नव्हतं पण तात्यांची पुण्याई कामी येत गेली. अनुभव येत गेले. अनेकदा शिक्षकांच्या पगारी कशा करायच्या असा प्रश्न असायचा. मी त्यावेळी एलआयसीचं काम करायचो. त्याचं कमिशनसुध्दा आम्ही संस्थेत टाकायचो. वडिलांची पगारसुध्दा अनेकदा संस्थेत जायची. पण हे वाढवायचंय ही जिद्द असायची.
प्रश्न-अशा कठीण वातावरणात हे टिकेल हा विश्वास कोठून आला?
दीपक घुमरे-काही उभारायचं असेल, नवीन निर्माण करायचं असेल तर विश्वास ठेवावाच लागतो. एखाद्या गोष्टीवर, एखाद्या प्रकल्पावर 100% विश्वास ठेवल्याशिवाय यश मिळतच नाही.
प्रश्न-मान्य आहे, पण हा विश्वास येतो कोठून?
दीपक घुमरे-माझ्या पुरतं म्हणाल तर मला हा विश्वास तात्यांकडून मिळाला. ते सातत्यानं सांगायचे. घाबरू नको यश मिळेलच. तुम्ही गुणवत्तापूर्व प्रयत्न करा. एक ना एक दिवस पालकांना तुमची गुणवत्ता लक्षात येईल आणि आता तसंच घडतंय अनेक वर्ष आम्हाला 80ते 100 च्या पुढे पट नेता येत नव्हता पण आम्ही सर्वांनीच जिद्द सोडली नाही, गुणवत्ता सोडली नाही. सातत्य आणि गुणवत्ता यामुळेच आजचे यश पहायला मिळत आहे.
प्रश्न-हे जे काही आज उभे राहिले त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या असे वाटते?
दीपक घुमरे-पहिली गोष्ट म्हणजे प्रेरणा, ती मला घरातूनच मिळाली. दुसरं ,मेहनत करण्याची तयारी, ती मला स्वत:लाच करायची होती. तिसरं सातत्य. चौथी गोष्ट प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाची म्हणजे आर्थिक बाबी. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आम्हाला वेगवेगळे सोर्सेस तयार करावे लागले आणि आम्ही ते करत गेलो.
प्रश्न-संस्था उभारण्यासोबतच आपण संघटनेकडेही लक्ष दिलं आहे. तात्यांच्या काळातील संघटन आणि आजचे संघटन यात काय बदल जाणवतात?
दीपक घुमरे-काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात. संघटनाच्या कामातही तसे बदल झाले आहेत. पूर्वी प्रश्न निर्माण झाले की लोक संघटनेकडे यायचे. त्याकाळी अनेक प्रश्न होते. वेतनश्रेणीचा विषय असेल, शिक्षण विभागात येणार्या अडचणी असतील. त्यावेळी शिक्षक अर्ज घेवून तात्यांकडे यायचे. तात्या त्यांना अगोदर संघटनेचा सभासद व्हायला लावायचे. त्यांनी परिवार म्हणून संघटना चालविली. नंतरच्या काळात वेतन आयोगाचा कायदा झाला. इतरही अनेक प्रश्न मिटत गेले. आता फार छोटे छोटे प्रश्न शिल्लक आहेत. शासन निर्णयातील एखाद्या तृटीबद्दल किंवा इतर छोट्या प्रश्नांबद्दल लढावे लागते.
प्रश्न-पण संस्थांचे प्रश्न कायम आहेत?
दीपक घुमरे-होय. मी शिक्षण संस्था महामंडळाचंही काम करतो. आज शिक्षणसंस्थांसमोर अनेक प्रश्न आहेत. पूर्वी वेतनेत्तर अनुदान बारा टक्के दिले जायचे. नंतर शासनाने ते बंद केले. आमच्या आंदोलनातून ते पाच टक्के आले आहे. पण ते पुन्हा बारा टक्के झाले पाहिजे. आज केवळ पगाराचा पैसा सरकार देते पण इतर गोष्टी भागवायच्या कशा. 2004 पासून सरकारने इमारत भाडे देखील दिलेले नाही असे अनेक प्रश्न आहेत.
प्रश्न-संघटन कुठे शिकलात?
दीपक घुमरे-चळवळीचा वारसा मला घरातूनच होता. तात्या (द.बा.घुमरे) स्वत: कुशल संघटक होते. त्या सोबतच राजाभाऊ उदगीरकर, पी.जी.दस्तूरकर हे सारे आमच्या घरी यायचे. त्यांच्या चर्चा व्हायच्या त्यातूनच या सार्या गोष्टी शिकत गेलो.
प्रश्न-शिक्षण क्षेत्रासमोर काय आव्हाने वाटतात?
दीपक घुमरे-शिक्षणाचा खर्च कमीत कमी करायची सरकारची भूमिका आहे. खरं तर शिक्षणाकडे भावी पिढीवरची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. पण सरकारी धोरण तसे नाही. मागच्या काळात कंपनी कायद्याखाली शाळा देणं सुरू झालं. ज्यांनी या शाळा उभारल्या ते याकडे व्यवसाय म्हणून पाहतात. मग ज्यांची पैसे देण्याची क्षमता नाही त्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश कसा मिळणार? मग गरीबांच्या लेकरांच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या गरजा कोणी भागवायच्या? त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कोणी द्यायचं ही सारी आव्हानं आहेत आणि त्यावर विचार करावाच लागेल.
प्रश्न-आपण एक पतसंस्थाही चालवता त्याची संकल्पना काय होती?
दीपक घुमरे-खरं तर ही पतसंस्था उभारली ती माझे वडील द.बा.घुमरे यांनी. त्याकाळी बँकामध्ये फारशी स्पर्धा नव्हती. शिक्षकांना कोणी लवकर कर्ज देत नव्हतं. म्हणून शिक्षकांची पतसंस्था असली पाहिजे हा विषय समोर आला. पण पतसंस्था काढायची तर किमान 100 सभासद लागायचे. आमच्या एकट्या संस्थेत तेवढे शिक्षक नव्हते. म्हणून मग वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांच्या शिक्षकांना एकत्र आणून 1989 ला ही पतसंस्था स्थापन झाली. आज त्या पतसंस्थेचा कारभार मी पाहतो. आज आमच्या पतसंस्थेचे शेअर्स 2 कोटीपर्यंत गेले आहेत.
प्रश्न-आपण राजकारणकडेही वळला होतात?
दीपक घुमरे-चळवळ करायची, चळवळीतल्या घटकांना न्याय द्यायचा, त्यांचे प्रश्न सोडवायचे तर कोठेतरी राजकीय आधार लागतो म्हणूनच चांगल्या लोकांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न-आपण शेतीमध्येही प्रयोग करता अशी माहिती आहे?
दीपक घुमरे-होय. मागच्या दोन वर्षापासून मी शेतीकडेही लक्ष देतोय. शेतीमध्येच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता आहे. प्रत्येकाला नौकरी मिळू शकत नाही. पण शेतीमधून उद्योग आणि रोजगार निर्माण करता येतो. पारंपारिक पिकांच्या पलिकडे जाऊन काहीतरी वेगळं केलं तर अनेक संधी आहेत. म्हणूनच मी सध्या शेतात सीताफळ लागवड केलेली आहे.
प्रश्न-हे सारं करताना स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ कधी देता?
दीपक घुमरे-अर्थातच सुट्टीच्या दिवशी.
प्रश्न-तुम्हाला कशात रमायला आवडतं?
दीपक घुमरे-मित्र परिवारात. त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं, त्यांच्याकडून माहिती घेणं याची मला आवड आहे. तो माझा छंदच असल्यासारखं आहे. त्या सोबतच फिरायला जायला आवडतं.
प्रश्न-भविष्यातील संकल्पना काय आहेत?
दीपक घुमरे-शिक्षण क्षेत्रामध्येच काहीतरी मोठं करायचं आहे. बीड जिल्हयामध्येसुध्दा ग्रामीण भागापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचले आहे ही बीड जिल्ह्याची ओळख निर्माण करायची आहे. आणि सर्वांच्या सहकार्याने ते करून दाखवायचं आहे.