जालना - जिल्ह्यातील एका तरुणाला क्रिकेट खेळताना प्राण गमावावा लागल्याची घटना घडली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार जालनामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेतील सामना जालन्यातील फ्रेजर बॉईज मैदानावर खेळवण्यात येत होते.
सध्या नाताळाच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे ख्रिसमस ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पण या स्पर्धेत सामना खेळत असताना सोमवारी ३२ वर्षांच्या विजय पटेल या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने प्राण गमवावे लागले आहेत.तो सामन्यात फलंदाजी करत होता. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्याने एक जोरदार षटकार मारला होता. त्यानंतर तो त्याच्या सहकारी फलंदाजाशी बोलला देखील पण परत क्रिजमध्ये जात असताना अचानक तो मैदानावर कोसळला.
तिथे असलेल्या इतर सहकाऱ्यांनी तो कोसळल्याचे पाहाताच त्याच्याजवळ धाव घेतली. दोन्ही संघातील खेळाडू आजू-बाजूला दाखल झाले. त्याची स्थिती गंभीर दिसत असतानाच सर्वांनी धावाधाव केली. आयोजकांनी विजयला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली.मात्र हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. त्याच्या निधनामुळे त्याच्या संघसकाऱ्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. विजय खेळत होता आणि त्याने संघसहकाऱ्याशी चर्चाही केली होती. पण असं असतानाही काही क्षणातच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वांसाठी ही धक्कादायक गोष्ट होती.
त्याच्या निधनाने जालन्यात हळहळ व्यत्त होत आहे. विजय पटेल हा मुंबईतील नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे समजत आहे. अवघ्या ३२ व्या वर्षीच त्याचा मृत्यु झाल्याने खळबळही उडाली आहे.दरम्यान, क्रिकेट मैदानात हृदयविकाराचा झटका येऊन जीव जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.