Advertisement

 महिलांना महाराष्ट्रात फिरताना भीती वाटतेय!

प्रजापत्र | Tuesday, 24/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई- गेल्या महिन्याभरात झालेल्या हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलिस ठाण्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यु,या घटनांनी राज्य सरकारची कोंडी झाली आहे. तर विरोधकांकडूनही जोरदार प्रहार केले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? माझ्या मनात भिती वाटतेय, असे विधान केले आहे. तसेच मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भिती वाटली नाही. पण आता महिला म्हणतात, आम्हाला भीती वाटतेय, अशी प्रतिक्रियाही खासदार सुळे (Supriya Sule) यांनी दिली व्यक्त केली आहे.

राजकारणाच्या पुढे जाऊन नात्यातला ओलावा कुणाचा असेल तर त्यांचं नाव शरद पवार आहे. बीड आणि परभणीला पहिले साहेब गेले. त्यानंतर सत्तेमधील जे इतके दिवस महाराष्ट्रातच होते ते आता जात आहेत. पण पहिले जाणारे आमचे खा. बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) जे पार्लमेंन्ट सोडून बीडला गेले. पवार साहेब हे पहिले नेते आहेत जे बीड आणि परभणीला जाऊन आले.

मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की हा विषय अतिशय गंभीर आहे. या संदर्भात एसआयटी लावली आहे, पण पोलिसांची बदली केलीय पण त्यावरून प्रश्न सुटत नाहीत. याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर कशाला अन्याय करता. कदाचित कोणीतरी मोठ्या माणसाने त्याला ऑर्डर दिली असेल. परभणीच्या घटनेमागे नक्की कोण आहे हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे.

ज्या क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्यात त्या दोन्ही घटना सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत. बीड आणि परभणीच्या घटना अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत.आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात याचा मला विश्वास बसत नाही. जे धक्कादायक आहे. सिनेमात पाहिलेय ते वास्तव आज महाराष्ट्रात दिसत आहेत.

Advertisement

Advertisement