Advertisement

संपादकीय अग्रलेख -‘बळा’चा सन्मान!

प्रजापत्र | Tuesday, 24/12/2024
बातमी शेअर करा

 छगन भुजबळ हे महायुतीचे मोठे नेते आहेत आणि महायुती म्हणून त्यांचा सन्मान राखला जाईल असे सुचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. छगन भुजबळ थेट भाजपात प्रवेत करतील किंवा नाही हे आज सांगता येणार नसले तरी भुजबळांची राज्यातील ताकद, त्यांची उपयुक्तता आणि त्यांची उपद्रव क्षमता या तिनही गोष्टींची जाणिव भाजपला आहे आणि म्हणूनच भुजबळांच्या याच ‘बळा’चा सन्मान महायुतीला करावा लागेल किंबहूना उद्या अजित पवारांनाही चेक देण्याच वेळ आली तर त्यावेळी भाजप भुजबळांचे कार्ड वापरू शकते.

मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या भुजबळांनी घेतलेला आक्रमक पावित्रा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि त्यातील माणिकराव कोकाटेंसारख्या बोलघेवड्या नेत्यांना फारसा गांभीर्याचा वाटला नसणे सहाजिक आहे. मुळात राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी एकसंघ असताना, त्याही अगोदर काँग्रेसमध्येच हे सारे एकत्र असतानाही अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे फारसे पटलेले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसवर बसलेला मराठा पक्षाचा शिक्का पुसण्यासाठी छगन भुजबळ, जयदत्त क्षीरसागर असे चेहरे त्यावेळी शरद पवारांकडून दाखविले जायचे. मात्र तरीही भुजबळ अजित पवारांना फारसे कधी रूचले नाहीत, त्यामुळे अजित पवार म्हणजेच सर्वस्व असे वाटणार्‍या इतरांना देखील आता भुजबळांना डावलने यात काहीच वावगे वाटणार नव्हतेच. पण या सर्वांच्या पलिकडे जावून राजकीय आकलन शक्तीच्या बाबतीत भाजपची भूमिका अर्थातच वेगळी राहिलेली आहे. खरेतर भुजबळांची नाराजी हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असे म्हणून भाजपला अंग झटकता आले असते पण भाजपच्या अनेक नेत्यांनी भुजबळांच्या नाराजीत लक्ष घातले. ओबीसी राजकारणात हे महत्वाचे असते. मागे एकदा गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ असताना छगन भुजबळांनी ते भाजपच्या विरोधी पक्षात असतानाही मुंडेंसाठी आपले बळ वापरले होते.
महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत ओबीसी राजकारण किती महत्वाचे आहे याची जाणिव देवेंद्र फडणवीसांना आहे तशीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही आहे. महाराष्ट्रात महायुतीला जे मोठे यश मिळाले त्यामागे ओबीसी समाज महायुतीसोबत आला हे मोठे कारण आहे. हा ओबीसी समाज एकट्या भाजपमुळे महायुतीसोबत आलेला नाही हे देखील तितकेच खरे. ज्यावेळी राज्यातील परिस्थिती सामाजिक धु्रवीकरणाची होती त्यावेळी ओबीसींच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेणारा एकमेव नेता म्हणून छगन भुजबळच समोर आले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या ओबीसी केंद्री राजकारणातील छगन भुजबळ यांचे स्थान त्यांच्या विरोधकांनाही नाकारता येणार नाही.
भाजपने आता नेमका हाच धागा पकडला आहे. ‘कोण दादा, कसला वादा’ अशी थेट टीका करत छगन भुजबळांनी अजित पवारांना अंगावर घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना भेटीसाठी भरपूर वेळ देतात, केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर भाजपचे अनेक नेते भुजबळांना गोंजारतात, देवेंद्र फडणवीस जाहीरपणे छगन भुजबळ महायुतीसाठी किती महत्वाचे आहेत हे सांगतात यात खुप काही आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळ एकटे पडू नयेत आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भुजबळांना तसे एकटे पाडणार असेलच तर भुजबळांसमोर सक्षम पर्याय उपलब्ध आहे हाच संदेश देवेंद्र फडणवीस यांच्या या जाहीर विधानातून गेलेला आहे.
आज जरी महायुतीला प्रचंड बहूमत असले तरी भाजपला राज्यातील स्थानिक निवडणुका देखील लढवायच्या आहेत, केंद्रात नितीशकुमार आणि चंद्राबाबू कोणत्याक्षणी काय करतील हे सांगता येत नाही त्यामुळे आगामी काळात भाजपला पुन्हा एकदा जनतेत घुसणारा चेहरा हवाच आहे. एकीकडे भाजप पुढच्या निवडणुकीत शतप्रतिशतची घोषणा देत असतानाच अजित पवारांना आधुनमधून मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतच असतात. त्या स्वप्नांवर अंकुश लावायचा असेल तर त्यासाठी देखील छगन भुजबळांसारखा चेहरा भाजपला ‘हातचा’ मिळणार असेल तर तो हवाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांच्या सन्मानाची जी काही भाषा बोलत आहेत तो सन्मान अर्थातच भुजबळांच्या राजकीय, सामाजिक ‘बळा’चा आणि भाजपच्या राजकारणाचा असणार आहे.

Advertisement

Advertisement