Advertisement

बीड,परभणीच्या घटनांमुळे राज्यातील जनता संतप्त

प्रजापत्र | Monday, 16/12/2024
बातमी शेअर करा

नागपूर- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर सडकून टीका केली. "संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी," अशी मागणी पटोले यांनी केली. विधानसभेत पटोले यांनी दोन्ही घटनांचा मुद्दा उपस्थित केल्यावर, सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष ज्या दिवशी चर्चा करण्यास सांगतील त्या दिवशी चर्चा करू.

 

 

सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे!

त्यानंतर विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप केल्याची माहिती पोलिसांना होती पण देशमुख यांची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले. भाजपा सरकार आल्यानंतर दलित व बहुजन समाजावर अत्याचार केले जात आहेत का? ईव्हीएम सरकारने राज्यात राजकीय हत्यासत्र सुरु केले आहे का? परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांना कोठडीत असताना पोलिसांनी प्रचंड हालहाल करून मारण्यात आल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असून ही सरकार प्रायोजित हत्या आहे. या प्रकरणी सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे."

 

 

परभणीच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, "संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी पवार नावाच्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले जाते परंतु तो व्यक्ती बांग्ला देशातील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाला होता. सरपंच संतोष देशमुख सुद्दा हिंदूच आहे, त्यांचे हातपाय कापले, मृत्युनंतर त्यांच्या शरिरावर आरोपी नाचले, त्यांना काय म्हणणार. बांग्ला देशातील हिंदू सुरक्षित नाहीत म्हणता मग भारतातील हिंदुंच्या संरक्षणाचे काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परभणी व बीडचे प्रकरण मारकडवडीच्या ईव्हीएम विरोधातील मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका येते."

 

Advertisement

Advertisement