Advertisement

सरपंच हत्या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी

प्रजापत्र | Monday, 16/12/2024
बातमी शेअर करा

बीड- केज तालुक्यातील मस्‍साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case) राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणी आज सोमवारी (दि.१६) विधानपरिषदेत चर्चा झाली. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत दिली.

बीडच्या पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. कोणीही गुन्हेगार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

मस्‍साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्या निलंबनाचीदेखील मागणी करण्यात आली होती. दरम्यान, त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्यात आले. तर याच प्रकरणात पीएसआय पाटील यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. मस्साजोग येथील सरपंचाचे भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे आढळून आला होता. मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार दिसून आले होते

 

 

परभणी, बीडमधील घटना धक्कादायक
परभणी, बीडमधील घटना धक्कादायक आहे. यावर सरकारने भूमिका मांडावी, अशी विनंती काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज विधीमंडळात (Maharashtra Assembly Winter Session) केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन्ही घटनांवर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले. या घटना गंभीर आहेत. संविधानाचा अपमान कोणीही सहन करणार नाही. योग्य उपाययोजना करु. कायदा आणि सुव्यवस्था कशी राखता येईल ते पाहू, असे फडण‍वीस म्हणाले. बीड-परभणीसारख्या गंभीर घटनांचे राजकारण करणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement