पुणे-दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची लेक पंकजा व पुतणे धनंजय या बहीण भावाची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळणार असल्याचे चित्र आहे.रविवारी (दि.१५) मंत्री मंडळाच्या विस्तारात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे ओबीसी वर्गात आनंद उस्तव साजरा करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वंजारी ओबीसी विकास महासंघ भारतचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ पूर्ण ताकदीने एकत्र आले होते. पण तरीही पंकजा मुंडे यांना ६ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भाजपने पंकजा यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यामुळे आमदार झालेल्या पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये संधी मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. तर दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग इथं झालेल्या सरपंच हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी होत होती. त्यामुळे मुंडे बहीण-भावाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये धाकधूक होती. परंतु आता अखेर भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असून आज या दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.बहीण भाऊ एकाच वेळी राज्याच्या मंत्री मंडळात काम करणार असल्याने बीड जिल्हा आणि राज्यातील ओबीसींसाठी ही मोठी आनंदाची बाब असल्याचे वंजारी ओबीसी विकास महासंघ भारतचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी म्हटले आहे.
प्रजापत्र | Sunday, 15/12/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा