दिल्ली- भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाली आहे. यामुळे संसदेत संविधानावर विशेष चर्चासत्र सुरू आहे. या चर्चेत आज लोकसभेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संविधानावर आपले विचार मांडले आहे. यावेळी श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधीमध्ये खडजंगी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संसदेत काही काळ गोंधळ उडाला होता.
यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, आता आम्ही सगळ्यांना घरी बसवलं आहे. हे बोलताच सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांना उत्तर देण्यासाठी राहुल गांधी उभे राहिले होते. तेव्हा शिंदे म्हणाले, राहुल गांधीजी तुमच्या आजीने इंदिरा गांधीजींनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. त्यापण संविधान विरोधी होत्या का? असा सवाल श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींना विचारला होता.
त्यानंतर राहुल गांधी उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यांनी माझे नाव घेतले आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार त्यांच्या खुर्चीकडे गेले होते. यावर किरण रिजीजू म्हणाले की, जर एका खासदाराने कोणाचे नाव घेतलं तर उत्तर देण्याचा अधिकार ज्यांचे नाव घेतले गेले त्यांना आहे. यावर काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल म्हणाले की, श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींचे नाव घेतले आहे. त्यापेक्षा थेट विरोधी पक्ष नेत्यांना प्रश्न विचारा ते उत्तर देतील.
या सगळ्या गोंधळानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी लहान असताना सावरकरांबाबत इंदिरा गांधी यांना प्रश्न विचारला होता. सावरकर यांनी माफी मागितली होती. हे त्यांनी मला सांगितलं. महात्मा गांधी जेलमध्ये गेले होते. सावरकर यांनी माफी मागितली होती. मी सावरकर यांनी लिहिलेल्या लेटरमधील कोट वाचून दाखवला. यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की, संविधानाच्या नावाने यांनी फेक नरेटिव्ह चालवला जात आहे. यांनी संविधानाचा कव्हर असलेलं पुस्तक वाटले पण आत कोरी पाने होती. संविधान कोणाच्या राज्यात धोक्यात होतं?
आमच्या सरकारने ओबीसी आयोगाला विशेष दर्जा दिला आहे. आम्ही कलम ३७० हटवलं आहे. यांनी धारावीचा मुद्दा मांडला. आम्ही धारावीचा पुनर्विकास करण्याची योजना सुरू केली आहे. धारावीच्या लोकांना नवी आणि पक्की घर मिळणार आहेत. धारावीत दलित, आदिवासी, मागासलेले लोक राहतात. मात्र त्यांना पक्की घर देण्याला काँगेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध आहे, असं शिंदेंनी सांगितलं. त्यानंतर मैं भारत का संविधान हुं या कवितेच्या ओळी वाचून दाखवत श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेतील भाषण संपवलं.