आरसा विधानसभेचा /माजलगाव
बी. अनिकेत
माजलगाव दि. १४ (प्रतिनिधी ) : माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी भलेही आपल्या निवृत्तीची घोषणा करून जयसिंह सोळंकेंना राजकीय वारस जाहीर केले असेल, मात्र अजूनही प्रकाश सोळंकेंचे सारेच समर्थक त्यांचा हा निर्णय पचवायला तयार नाहीत, तर दुसरीकडे काही ठिकाणी प्रकाश सोळंके यांनाही 'मी माझा निर्णय पक्षाला सांगितलाय, मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल ' असे सांगावे लागत असल्याचे समजते. आता लोकसभेच्या दरम्यान आ. प्रकाश सोळंके यांच्या जवळ आलेल्या नितीन नाईकनवरे यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना 'आपण ठरवू तेच धोरण ' असे सांगितले आहे. त्यामुळे माजलगाव मतदारसंघातून स्वकीयांकडूनच जयसिंह सोळंकेंची वाट अवघड होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माजलगाव मतदारसंघाचे राजकारण तसे कायम वेगवेगळी वळणे घेणारे राहिलेले आहे. एक अपवाद वगळता आ. प्रकाश सोळंके या मतदारसंघाचे अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आलेले आहेत. विरोधकांनी कितीही मोठे आव्हान निर्माण केले तरी ऐनवेळी राजकीय 'चातुर्य ' वापरून आ. सोळंके विरोधकांवर भारी पडत आलेले आहेत. मात्र मागच्या काळात आ. प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांना आमदारकीचे वेध लागलेले आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हापरिषदेच्या सभापतिपदावर काम केलेले आहे. आ. प्रकाश सोळंके यांनी मागच्या निवडणुकीत 'ही माझी शेवटची निवडणूक ' असे भावनिक आवाहन केले होते, त्यामुळे देखील मागच्या पाच वर्षात जयसिंह सोळंके यांच्या अपेक्षांना घुमारे फुटले होतेच, त्यातच यावेळी एका खेड्यातून का होईना पण आ. प्रकाश सोळंकेनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आणि आपला राजकीय वारसा जयसिंह सोळंकेंकडे देत असल्याचे सांगितले. मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्याच अनेक जुन्या कार्यकर्त्यांना फारसा रुचलेला नाही. निवृत्तीच्या घोषणेनंतर आ. प्रकाश सोळंकेंच्या अनेक बैठक झाल्या, त्यात या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त करणारे सूर उमटत आलेले आहेतच. स्वतः प्रकाश सोळंके आणि जयसिंह सोळंके यांनीही हा सूर थोपविण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र कोठे तरी धुसफूस सुरु आहेच. त्यामुळेच काही ठिकाणी स्वतः प्रकाश सोळंके यांनाही 'पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल ' असे सांगावे लागले आहे. आ. प्रकाश सोळंके यांची ही भूमिका जयसिंह सोळंके यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. त्यातचआतापर्यंत प्रकाश सोळंके यांच्यासोबत असलेल्या अशोक डक यांनी वेगळी वाट धरण्याचे संकेत दिले आहेत, तर एकेकाळचे आ. प्रकाश सोळंके यांचे समर्थक असलेले, मात्र नंतर नंतर दुरावलेले आणि मराठा आरक्षण आंदोलन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आ. प्रकाश सोळंके यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले नितीन नाईकनवरे यांनीही 'वेगळे धोरण 'ठरविण्याचे संकेत दिले आहेत. हे तर जाहीरपणे झाले, त्यापलीकडे जाऊन छुप्या पद्धतीने काम करणारे अनेक आहेतच. हे सारे जयसिंह सोळंके यांची वाट अवघड करणारे ठरू शकते, या गतिरोधकांना जयसिंह सोळंके कसे पार करणार यावर त्यांचा विधानसभेचा मार्ग ठरणार आहे.