Advertisement

निवडणूक लढविण्यासाठी आरपारच्या भूमिकेत जगताप

प्रजापत्र | Saturday, 14/09/2024
बातमी शेअर करा

आरसा विधानसभेचा / माजलगाव
 बी.अनिकेत
माजलगाव दि. १३ :  दिवसेंदिवस विधानसभेच्या सारीपाटाचा खेळ रंगत असून माजलगाव मतदार संघाची विधानसभेची जागा ही अजित पवार गटाकडे गेल्याने मोहन जगताप कार्यकर्ते आरपार च्या भूमिकेत दिसत आहेत  भाजप ला नारळ देण्याची तयारी जगताप गट करत असल्याचे स्पष्ट होत असून तिन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत तशी उघड भूमिका घेतली असल्याने मोहन जगताप आगामी काळात भाजप ला नारळ देऊन तुतारी ची वाट धरू शकतात.
  सत्तेचा सारीपाट खेळण्यासाठी अनेक भावी आमदार इच्छुक असून माजलगाव मतदार संघात अनेक दिवसांपासून बाशिंग बांधून तयार असलेले मोहन जगताप यांची आमदार होण्याची इच्छा लपून राहिली नाही.  परंतु वारंवार प्रयत्न करून सतत पदरी निराशाच पडल्याने ऐनवेळी निवडणुकीच्या आखड्यातून माघार घेणारे नेते अशीच ओळख गेल्या निवडणुकीपासून मोहन जगताप यांनी झाली.  ऐनवेळी निवडणुकीत माघार घेत असल्याच्या भूमिकेने कार्यकर्ते देखील हिरमुसून जात होते परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या धर्मातून जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ला सुटल्याने पुन्हा त्यांची गोची झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असतानाच जगताप कार्यकर्ते मात्र वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहेत. काहीही झालं तरी यंदा मोहन जगताप यांना निवडणुकीत उभा राहण्याची मागणीच झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे.शरद पवार यांच्याशी घरोबा झाल्यानंतर त्यांचा प्रमुख नेते म्हणून ओळख राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निर्माण झाली होती परंतु बदलती राजकारणे यात आ.प्रकाश सोळंके यांची राष्ट्रवादी मध्ये एन्ट्री झाली आणि एकच म्यानात दोन तलवार झाल्या परिणामी त्यावेळी मोहन जगताप यांनी भाजप चे कमळ हाती घेऊन घड्याळाला राम राम केला.भाजप मध्ये येऊन ही १९ च्या निवडणुकीत ऐनवेळी रमेश आडसकर यांनी उमेदवारी पदरी पाडून घेत जगताप यांना धक्का दिला त्यानंतर स्वतः मोहन जगताप यांच्या कडे विधानसभा प्रमुख भाजपने बहाल करून त्यांना बंधनात ठेवण्याची तजवीज करून पक्ष संघटन मजबूत ठेवल्यात यश मिळवले परंतु आता राज्याच्या बदलत्या धोरणानुसार सदरील माजलगाव विधासभेची जागा ही अजित पवार गटाच्या ताब्यात गेल्याने मोहन जगताप यांचे उमेदवार म्हणून दरवाजे पुन्हा बंद झाल्याने कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेऊन वेळप्रसंगी भाजप ला नारळ द्या पण  विधानसभा लढवा अशी मागणी जोर लावून करत असून जगताप सुद्धा भाजप ला नारळ देण्याच्या भूमिकेत असल्याचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगत आहेत.
  ---
तुतारी हातात घेण्याची मागणी पण ती वाटही अवघडच
 माजलगाव मतदार संघातील धारूर,वडवणी आणि माजलगाव यामधील प्रमुख कार्यकर्त्यांची बीड येथे महत्वपूर्ण अशी बैठक झाली यात भाजप कडून मोहन जगताप याना तिकीट न मिळाल्यास तुतारी हाती घेण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मा.आ. राधाकृष्ण अण्णा होके पाटील आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा किल्ला जिद्दीने लढवून वरचष्मा केला आणि एक ऐतिहासिक विजय मिळवून लोकसभेची जागा तुतारीच्या हाती दिली त्यामुळे होके पाटील सुद्धा पुन्हा राजकीय सक्रिय झाले असून त्यांचे दौरे सुरू आहेत त्यामुळे अडचणीत असतांना होके पाटलांनी शरद पवारांनी राष्ट्रवादी सावरली असताना ऐनवेळी आयात उमेदवार म्हणून मोहन जगताप यांच्या साठी तुतारीची वाट बिकट मानली जात आहे.
---
 कार्यकर्त्यांची  फौज मात्र जोमात जोमात
  साखर कारखान्याच्या माध्यमातून मोहन जगताप यांनी मतदार संघात वेगळी ओळख मिळवण्यात यश मिळवले असून गावागावांत कार्यकर्ते निर्माण करण्यात यश मिळवले आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनावर निवडणूक लढवली तर नक्कीच मोहन जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडू शकते.
---

Advertisement

Advertisement