अंबाजोगाई-तालुक्यातील घाटनांदुर, बर्दापूर व अंबाजोगाई या खरेदी केंद्राची हरभरा-तूर खरेदीची मुदत आज (दि.१९) १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. वरुणराजाचे आगमन झाल्यामुळे हरभरा-तूर खरेदीसाठी व्यत्यय येत होता.पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोनासारख्या गंभीर आजाराचा सामना करीत असताना बिच कँन्डी रूग्णालयातून केंद्रीय कृषी मंञालयाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख यांनी दिली.
अंबाजोगाई तालुक्यामधील एकूण १.७५ लाख क्विंटल हरभरा उत्पादन होते.त्यापैकी फक्त १५००० क्विंटल हरभरा खरेदी झाली होती.उर्वरित हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. त्यानुसार मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंञालयाकडे पाठपुरावा करून मुदतवाढ मिळविली आहे.
हरभरा खरेदीचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करा
महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे एफसीआय मार्फत महाराष्ट्र शासनाकडे जमा झालेले आहे.परंतु सदरील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजतागायत जमा करण्यात आले नाहीत. तरी हरभरा खरेदीचे पैसे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मदत करावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्वरित आदेश द्यावे; अशी मागणी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख यांनी केली