केज दि.३ (प्रतिनिधी ) - एखादे ध्येय समोर ठेवून जन माणसांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडत असताना त्या अभियानाला जर वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ मिळाले तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित होतो. आणि असाच उत्साह केज विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डॉ. अंजली घाडगे यांचा वाढला असून विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे झंझावती दौरे सुरू असून प्रतिसाद ही त्याच प्रमाणात मिळत आहे.
डॉ. अंजली घाडगे सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरामधून समोर आलेले व्यक्तिमत्त्व आहे. कुटुंबात राजकीय आणि सामाजिक वातावरण असल्याने आपसूकच डॉ. अंजली घाडगे यांच्यावरही त्या विचारांचा वारसा जाणवतो. डॉ. घाडगे यांचे वडील स्वर्गीय रामराव घाडगे हे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेले एक जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आणि कुटुंबातील इतर सदस्यही अगदी उच्चपदस्थ, त्यामुळे आपण राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कामांमध्ये उतरावं अशी इच्छा मनाशी बाळगून डॉ. घाडगे यांनी 2014 मध्ये केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी अतिशय नवख्या असलेल्या डॉ. घाडगे यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु त्या पराभवाने खचून न जाता डॉ. घाडगे यांनी मतदारसंघांमध्ये आपला संपर्क कायम ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, गरज पडेल तिथे मदत करणे असे उपक्रम मागच्या दहा वर्षांपासून त्यांचे सुरूच आहेत. आणि याच त्यांच्या जमेच्या बाजू असून मतदार संघामध्ये त्यांचा दांडगा संपर्क झालेला आहे. आणि आता थेट राजकीय क्षेत्रामध्ये आपली भूमिका स्पष्ट करत त्यांनी राशपमध्ये जाहीर प्रवेश केला. आणि विधानसभा मतदारसंघाची दावेदारी ही स्पष्ट केली. राशप मध्ये प्रवेश करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले त्यांचे कौतुक आणि कामाला लागण्याचा आदेश हा बरंच काही सांगून जातो. पूर्वीपासून डॉ. घाडगे ह्या जनसंपर्कात तर आहेतच. परंतु प्रवेश झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेला त्यांना पाठिंबा त्यामुळे डॉ. घाडगे यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
केज विधानसभा मतदारसंघातील नेकनूर, केज, आंबेजोगाई इत्यादी भागातील अतिशय ग्रामीण भागात त्यांनी आपला संपर्क दौरा सुरू केला असून विविध कार्यक्रमांना त्या न चुकता हजेरी लावत आहेत. एवढेच नव्हे तर काही गावातील लोक डॉ. घाडगे यांना फोन करून गावात येण्याची विनंती सुद्धा करत आहेत. अगदी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत डॉ. घाडगे या गावागावात जात आहेत आणि ज्या ज्या गावात त्या जातील त्या त्या गावात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याने दिवसेंदिवस डॉ. घाडगे यांचा विश्वास वाढताना दिसत आहे. दरम्यान डॉ. घाडगे यांनी संपर्क अभियानाची पहिली फेरी पूर्ण केली असून येत्या काही दिवसांमध्ये काही विशेष उपक्रमांचेही आयोजन त्या करणार आहेत. त्यामुळे राशप कडून त्यांचा सकारात्मक विचार होण्याची शक्यता दिसून येत आहे.
बातमी शेअर करा