बीड दि.३१ (प्रतिनिधी) - शाळा सुटल्यानंतर घरी जाताना एका आठ वर्षाच्या मुलाने किराणा दुकानातील चॉकलेट चोरल्याचा संशयातून दुकानातील महिलेने बालकाला झाडाला बांधून ठेवले. हा संतापजनक प्रकार केज तालुक्यातील एका गावात गुरुवारी घडला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी कि,केज तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारा आठ वर्षीय मुलगा हा दुपारच्या सुट्टीत घरी जात होता. जाताना त्याने आपल्या किराणा दुकानातील चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून महिलेने या बालकाला दुकानासमोरच असलेल्या प्राजक्ताच्या झाडाला बांधले. दुपारच्या सुट्टीत आपला मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने मुलाची चौकशी करून त्याचा शोध घेतला आसता, त्याला झाडाला बांधल्याचे पाहिले. रडताना त्याने पाणी मागितले तरी त्याला पाणी न देता मारहाण केली. हे बालक घाबरल्यामुळे त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या मुलाच्या छळवणूक प्रकरणी बालकाच्या आईच्या फिर्यादीवरून कविता पांडुरंग जोगदंड, पांडुरंग भाऊराव जोगदंड आणि गोपाळ पांडुरंग जोगदंड या तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू हे करीत आहेत.