Advertisement

 आर्मीमध्ये भरती करण्याच्या नावाखाली तीन तरुणांना फसविले

प्रजापत्र | Saturday, 17/08/2024
बातमी शेअर करा

आर्मी मध्ये भरती करून देतो म्हणून आर्मी मध्येच कुक म्हणून नोकरी करणार्‍या व्यक्तीने चार तरुणांना आठ लाख तीस हजार रुपयांचा गंडा घातला. आर्मी मध्ये सिव्हिल डिफेन्स, एम. टी. एस. कुक, क्लर्क पदावर भरती करतो असे तो सांगत होता. तीन तरूणांकडून प्रत्येकी दोन लाख व एका तरूणाकडून दोन लाख ३० हजार रूपये असे आठ लाख ३० हजार रूपये ऑनलाईन घेतल्याचे मिलीटरी इंटेलिजन्स व भिंगार कॅम्प पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आले.

 

 

सिव्हिल डिफेन्स कुक विजय बीस्ट (पूर्ण नाव नाही, रा. वाकोडी फाटा, ता. नगर) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत संजयसिंह राजेसिंह (वय २३ मूळ रा. उत्तराखंड, हल्ली रा. सीटी बटालियन हेडक्वॉर्टर, एमआयसी अ‍ॅण्ड एस, सोलापूर रस्ता, नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सन २०२३ मध्ये विजय बीस्ट याने आर्मीमधील सिव्हिल डिफेन्स, एम. टी. एस. कुक, क्लर्क पदावर भरती करून देतो.

 

 

माझी लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांशी ओळख आहे, असे म्हणून फिर्यादीसह उत्तराखंड, पंजाब व नगर येथील चौघा तरूणांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एकुण आठ लाख ३० हजार रूपये ऑनलाईन घेतले. त्यांना नोकरी दिली नाही व पैसे न देता त्यांची फसवणूक केली असल्याची माहिती मिलीटरी इंटेलिजन्स यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. फसवणूक झालेले संजयसिंह राजेसिंह यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मिलीटरी इंटेलिजन्स व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विजय बीस्ट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.तसेच त्याने भरतीसाठी उभ्या केलेल्या उमेदवारांची येथील एका खासगी रूग्णालयातून बनावट वैद्यकीय तपासणी केली असून तो लष्कर व संरक्षणाच्या नागरी रोजगारासाठी फसव्या भरती रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागील पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस अंमलदार रवी टकले, प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Advertisement