Advertisement

  मनोज जरांगे अन् संभाजीराजे येणार एकत्र?

प्रजापत्र | Wednesday, 14/08/2024
बातमी शेअर करा

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सतत चर्चेत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दलची मागणी लावून धरली आहे. इतकेच नाही तर जरांगे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात देखील उतरणार आहेत. यादरम्यान मनोज जरांगे पाटीव आणि संभाजी राजे यांची 'स्वराज्य' संघटना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी स्वतः संभाजीराजे यांनी सूचक विधान करत स्पष्ट संकेत दिले आहेत.

विधानसभेबाबत जरांगेंशी चर्चा करणार असे संभाजीराजे म्हणाले आहेत. संभाजीराजे यांनी सांगितले की, मनोज जरांगे यांच्याबाबत माझी अद्याप चर्चा झाली नाहीये. पण चर्चा होणार हे मी नाकारू शकत नाही. चर्चा करायला काहीच हरकत नाही. शेवटी त्यांचा दृष्टीकोन आणि माझे उद्दीष्ट एकच आहे. शेवटी आमच्या पंजोबानीच म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेत आणलं. म्हणून मनोज जरांगे यांना माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. अद्याप राजकीय चर्चा झाली नाही पण लवकरच राजकीय चर्चा देखील होईल असेही संभाजीराजे म्हणाले.

सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. राजकीय दौरे-सभांचे आयोजन केले जात आहे. तर राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण यासारख्या योजना जाहीर करत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यादरम्यान मागील एक वर्षाहून अधिक काळापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.

उद्यापासून २० ऑगस्टपर्यंत विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती सुरू होणार आहेत. उमेदवारीबद्दलचा अंतिम निर्णय २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. जरांगे यांच्याकडून राज्यभरात काढण्यात आलेल्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ते विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार दिल्यास ते महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी अवघड ठरणार आहे.

Advertisement

Advertisement