गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामतीसंदर्भात केलेल्या विधानावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करणे ही माझी चूक होती, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यावर, आता राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या विधानावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सुप्रिया सुळे यांनी केवळ तीनच शब्दात प्रतिक्रिया देत अधिकचं बोलणं टाळलं. राम कृष्ण हरी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर, आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ देत थेट दिल्लीतील भाजप नेत्यांवरच निशाणा साधला. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहित रोहित पवार यांनी महायुतीतील बिघाडीवर लक्ष्य केलं आहे. आता, त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
दिल्लीच्या नेत्यांकडून अजित पवारांवर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दबाव आणण्यात आला होता. तसाच दबाव विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघात आणणार आहेत, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते. त्यावर प्रफुल पटेल यांना खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते झालेले आहेत, त्याच्यावर त्यांच्या पक्षांच्या लोकांनी बोललं पाहिजे, असे म्हणत पटेल यांनी रोहित पवारांच्या विधानावर अधिकचं बोलणं टाळलं. खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.
तो अजित पवारांच्या कुटुंबाचा विषय
लाडक्या बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उभं केलं ही मोठी चूक केली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर बोलताना प्रफुल पटेल यांनी अजित पवार हे आमच्या राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मनात जे सुरू होते ते बोलले असतील. मात्र, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न असल्यामुळे मी अधिक बोलणं योग्य नाही, असे पटेल यांनी म्हटले.
विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लाडकी खुर्ची योजना' आहे, अशी टीका केली होती. त्यावर देखील प्रफुल पटेल यांनी नाना पटोलेंवर पलटवार केला आहे. तुम्ही जितकी टीका कराल, तितकेच लोक तुमच्या विरोधात जातील आणि आमच्या बाजूने उभे राहतील, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. तसेच, लाडकी बहीण योजना ही अत्यंत चांगली व कायमस्वरूपी योजना असून आमच्या विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय, असेही पटेल यांनी म्हटले.
काय म्हणाले होते अजित पवार
राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती.