निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला धावणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या घोषणा हीच आता महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे. अशा घोषणांची ज्या नरेंद्र मोदींनी 'रेवडी ' म्हणून चेष्टा केली होती, त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हे होत आहे. 'लाडकी बहीण ' योजना त्यापैकीच एक. या योजनेच्या अंमलबजावणीत एकतर अनेक अडचणी, या अडचणींवर कोणी बोलायला लागले तर त्याला 'सावत्र भाऊ ' ठरविण्याचा थिल्लरपणा खुद्द मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीकडून केला जातो आणि जोडीला रवी राणांसारखे वाचाळ 'आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर दिलेले पंधराशे रुपये खात्यातून काढून घेऊ' असल्या धमक्या देतात . मग सरकारला आणि सत्तापक्षाला खरोखर 'लाडक्या बहिणींना ' मदत करायची आहे का यातून केवळ राजकारण करायचे आहे .
लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून फटका बसल्यानंतर , अजित पवारांच्या भाषेत मतदारांनी कंबरडे मोडल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी कसेंहीकरून विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींच्या भाषेतल्या 'रेवड्या ' उधळत चालले आहेत. याला अमुक देऊ, त्याला तमुक देऊ अशा मोफतच्या घोषणा करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे.'लाडकी बहीण ' योजना त्यापैकीच एक. आता स्वपक्षीय सरकारच्या या रेवडीबाजीवर भाजपने किंवा खुद्द नरेंद्र मोदींनी काही बोलावे इतक्या नैतिकतेची अपेक्षा त्यांच्याकडून करणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच . त्यामुळे तशी काही अपेक्षा न केलेली बरी . किमान जाहीर केलेली योजना तरी राजकारणापलीकडे जाऊन आणि योग्य पद्धतीने राबविली जावी अशजी अपेक्षा करण्यात गैर ते काय ?
पहिला प्रश्न योजनेच्या अंमलबजावणीचा. या योजनेचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येतील असे जाहीर केले गेले. मात्र अजूनही ऑलाईनची प्रभावी यंत्रणा नाहीच. जो काही गोंधळ सुरु आहे तो ऑनलाईनचाच. या योजनेच्या गरजांसाठी 'नारीशक्ती ' म्हणून एक स्वातीनंतर प्रणाली निर्माण केली गेली, मात्र त्याची क्षमता अगदीच भिकार म्हणावी अशी. थोड्या थंडीया वेळात ही प्रणाली अर्धमेली होत आहे. त्यामुळे अजूनही अनेक बहिणींना यावर अर्जच भरता आलेले नाहीत. ज्यांचे भरले गेले त्यांना स्वीकृती मिळत नाही. अर्ज भरण्यासाठी असलेल्या संकेतस्थळावर सातत्याने तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज प्रक्रिया रखडली आहे. अॅपवर अर्जनोंदणी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली असून संकेतस्थळावरून अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावरूनही वेगाने प्रक्रिया होत नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त करीत आहेत. खरेतर अशावेळी राज्यकर्ते म्हणून या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र अशा काही त्रुटींवर बोट दाखवणारांना 'सावत्र भाऊ ' ठरविण्यापलीकडे सत्ताधारी काही करीत नाहीत आणि असे 'सावत्रपण ' ठरविणारे खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच असतात . आता जिथे पंतप्रधानपदावरील व्यक्तीने काय बोलले पाहिजे याचे संकेत केव्व्हाच धुळीस मिळाले आहेत, तेथे मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार ? पण प्रश्न आहे तो इतकाच, इतरांना 'सावत्र ' ठरवून 'लाडक्या बहिणींना ' न्याय मिळणार का ?
दुसरा मुद्दे तर आणखीच विचित्र. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होणार ती सरकारी तिजोरीतून . सरकार म्हणजे या तिजोरीचे मालक नसते, तर विश्वस्तांच्या भावनेतून त्यांनी काम करणे अपेक्षित असते. मात्र मागच्या काही काळात सत्ताधाऱ्यांमध्ये असलेली ही मालकीची भावना कमालीची वाढली आहे. आता 'लाडक्या बहिणींना ' देण्यात येणार निधी म्हणजे जणू काही सत्ताधाऱ्यांच्या स्वतःच्या घामाच्या कमाईतून दिला जात आहे, हे लोक कोठे तरी बराशी खांद्याला गेले होते आणि त्यातून हाताला घट्टे पडल्यानंतर जी मजुरी मिळावी त्यातूनच 'लाडक्या बहिणींना ' सरकारी ओवाळणी टाकली जात आहे असे काही वर्तन सत्ताधाऱ्यांचे आहे. मागे राज्याच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या सत्तार नामक एका वाचाळ मंत्र्यांचे 'लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक ' असल्याचे विधान चर्चेत आले होते, आता त्यावर ताण केली आहे ती सत्ताधाऱ्यांचे आणखी एक लाडके वाचाळवीर रवी राणा यांनी. हे राणा दाम्पत्य सातत्याने काही ना काही वादग्रस्त बोलत असतेच. आता त्या रवी राणांनी लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. 'जर विधानसभा निवडणुकीत मतांच्या रूपाने आशीर्वाद दिला नाही तर दिलेले पंधराशे रुपये खात्यातून काढून घेतले जातील ' असे हे राणा महाशय म्हणत आहेत. बहिणीच्या ताटात टाकलेली ओवाळणी परत काढून घेण्याचा करंटेपणा भारतीय संस्कृतीत, हिंदू संस्कारात अजून तरी कोणी केल्याचे आठवत नाही. पण हा करंटेपणा करण्याचा इशारा रवी राणा देतात, म्हणजे सरकारी तिजोरीला हे काय स्वतःची जहागिरी समजत आहेत का ? या योजनेचे राजकारण करणार तरी किती याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळणार आहे का ? अजून तर बहिणींच्या खात्यावर निधी आलेला देखील नाही, तरीही ही तर्हा असेल तर सत्ताधारी राज्यातील जनतेला नेमके समाजात तरी काय आहेत ?