बीड दि.२९ (प्रतिनिधी)-कायदा सुव्यवस्था राखणे,गुन्हेगारीवर नियंत्रण यामधली बीड पोलिसांची 'कामगिरी' जिल्ह्याने आंदोलनादरम्यानच्या हिंसाचारात अनुभवली आहेच,मात्र आता रस्त्या-रस्त्यावर सुरु असलेले गुटखा,मटका,चक्री जुगाराचे अवैध धंदे देखील पोलिसांच्या 'कर्तव्यदक्षतेची' साक्ष देत आहेत. गल्लीबोळातच नव्हे तर चक्क हमरस्त्यावर हे धंदे सुरु असतील तर त्याचे लागेबांधे पोलिसांमधील कोणा-कोणाशी असतील हे वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे का ?
पोलिसांची जी काही म्हणून कामे आहेत,त्यात गुन्ह्यांची उकल करणे,कायदा सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि धाक राहिलं असे वर्तन देखील अपेक्षित आहे.मुळात अवैध धंद्यांची ठिकाणे ही अनेकदा मोठ्या गुन्ह्यांची उगमस्थाने असतात हे वारंवार दिसून आलेले आहे.जुगारावरून किंवा दारूच्या गुत्त्यावरील कुरबुरीतून मारामाऱ्याचं काय खून झाल्याच्या देखील घटना आहेतच.त्यामुळेच जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अवैध धंदे बंद असणे महत्वाचे असते,किमानपक्षी त्यावर नियंत्रण तरी असायला हवे.बीड जिल्ह्याने यापूर्वी 'मला अवैध धंदे चालणार नाहीत' असे ठामपणे सांगणारे आणि 'मला असे काही दिसले तर ठाणेदारावर कारवाई करील'असा दम भरणारे पोलीस अधीक्षक अनुभवलेले आहेतच.
आता मात्र जिल्ह्याला अवैध धंद्यांचा स्वर्ग म्हणावे अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.बीड शहरातील सुभाष रोड,जालना रोड असेल किंवा बार्शी रस्ता, या रस्त्यांची नावे यासाठी घ्यायची ,की हे बीडमधले हमरस्ते आहेत,या आणि सर्वच रस्त्यांवर सध्या ठिकठिकाणी मटका घेतला जातो,गुटखा विकला जातो आणि जुगाराची चक्री देखील सरेआम फिरते.विशेष म्हणजे हे काही आता लपून-छापून करण्याचे धंदे राहिलेले नाहीत, तर 'शूर आम्ही अवैध धंदेवाले, आम्हाला काय कोणाची भिती' या थाटात हे सारे धंदे सुरु असतात.(प्रजापत्रकडे या सर्वांचे व्हिडीओ देखील उपलब्ध आहेत),अगदी खेळायला येणाऱ्या कोणालाही अडविण्याची देखील अशक्त नसते,इतके उघडपणे हे सारे बीड शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे.
या साऱ्या धंद्यांना संरक्षण मिळावे यासाठी तीन ते चार टप्प्यावर 'प्रोटोकॉल' म्हणा किंवा 'मंथली' म्हणा करावी लागते असे या धंद्यातलेच लोक सांगतात. त्या परिसरातील ठाण्यापासून ते 'स्थानिक' शाखा आणि वरिष्ठांच्या 'विशेष पथक' पर्यंत सर्वांनाच 'खुश' ठेवले की मग या सर्वच अवैध धंदेवाल्यांना' संया भये कोतवाल, तो दर काहे का?' असे गाणे गुणगुणायला काय हरकत आहे. आता यावर पोलीस अधीक्षक काही बोलणार का मौनच पाळणार ?
(क्रमशः)
पाचशे मीटरच्या परिघात अवैध धंद्यांची जत्राच
हे अवैध धंदे जिल्ह्यात सर्वत्रच आहेतच, पण उदाहरणच द्यायचे तर बीड शहरातील एका ठिकाणी तर जणू अवैध धंद्यांची जत्राच भरली आहे का काय असे वाटावे असे चित्र आहे. ग्रामीण भागातील लोक लालपरीमधून बीड शहरात उतरले की चिखलातून वाट काढत रस्त्यावर यायचे आणि समोरच्या एका बोळात घुसायचे, मग तिथे प्रत्येक टपरीत मटका लावता येतो, गुटखा काय, अवैध दारू काय किंवा आणखी काय काय, जत्रेत जसे वेगवेगळे स्टॉल असतात तसे सारे त्या पाचशे मीटरच्या परिघात मिळते .