मुंबई - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे. हिंगोलीतून जरांगे यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठाची भेट घेऊन समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी, आपल्या भाषणातून राज्य सरकावर हल्लाबोल करत महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावलं. तर, मराठा आरक्षण आणि सगेसोयरेचा प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत आपण २८८ उमेदवारांना पाडणार, तसेच विधानसभेसाठी २८८ उमेदवार उभे करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली १ महिन्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे, राज्य सरकारचं काम नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय, याबाबत सरकारचे प्रतिनिधी आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे, असेही देसाई यांनी म्हटलं आहे.
आम्ही जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु, एकच महिन्यांचा कालावधी त्यांनी दिला. एक महिन्यात आम्ही त्यांना भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. दोन-तीन गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मांडल्या होत्या, त्यामध्ये सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेट या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या ४ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली, दुर्दैवानं महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची आठवण शंभूराज देसाईंनी करुन दिली. तसेच, त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे हे आम्हाला कळू शकलं नाही, बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात धरुन बसलेलो नाही,असे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
तेलंगणातून टीम परत आली
मराठा आरक्षणाच्या संदर्भाने रोजच्या रोज आम्ही आढावा घेत आहोत, बैठका घेत आहोत, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह जो जरांगे पाटील यांचा आहे, त्यासाठी आमच्या ११ अधिकाऱ्यांची टीम गेल्या ४ दिवसांपासून तेलंगणा गव्हर्मेंटकडे गेलेली आहे. तेलंगणातून ती टीम काल परत आलेली आहे. मात्र, त्यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. सोमवारी त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे, त्याबाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असे शंभूराज देसाईंनी सांगितले.
मनोज दादांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे
सगळे सोयरे संदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, आठ लाखापेक्षा जास्त ऑब्जेक्शन हरकती आलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा कालच्या बैठकीत याबाबतीत लीगल ओपेनियेन कायदेशीर पद्धतीने लोकांनी दिले आहे. त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे. आता, मनोज दादांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे, माझी त्यांना विनंती आहे, ते सातत्याने म्हणत आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांवर त्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नेहमीच आदेश दिलेले आहेत की, एकही दिवस वाया न घालवता याबाबतीतलं काम चालू ठेवा. त्यानुसार, दोन-तीन आठवडे अधिवेशनात गेले, सोमवारपासून रोजच्या रोज आमचा याबाबतीत काम करण्याचा प्रयत्न आहे, असेही देसाई यांनी म्हटले.