Advertisement

आषाढीला व्हीआयपी दर्शन बंदच

प्रजापत्र | Friday, 12/07/2024
बातमी शेअर करा

सोलापूर :  मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी  टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले . वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले . याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

आषाढी यात्राकाळात दर्शन रांगेत हजारो भाविक असताना बंद केलेले व्हीआयपी दर्शन हे बंदच राहणार असून सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन मिळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची खंबीर भूमिका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. प्रशासनाने कठोर भूमिका घेत सर्वच बड्या व्हीआयपी व्यक्तींनाही झटपट दर्शन देण्यास मनाई केल्याने बाकीचे घुसखोरी करणारे तथाकथित व्हीआयपी यांची घुसखोरी बंद झाली. यामुळेच 15 तास रांगेत उभं राहणारे  भाविक केवळ 4 ते 5 तासात आता देवाच्या  पायापर्यंत पोहचत आहेत. याच पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. दर्शन रांगेतील भाविकांना १५ लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . 

Advertisement

Advertisement