बीड दि.१० (प्रतिनिधी)- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जनजागृती व शांतता रॅलीचे उद्या दि ११ जुलै रोजी बीडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी लाखों मराठा समाजबांधव बीड शहरात येण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाकडून बीड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच बीड शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी कि, जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे बीड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांना अकरा जूलै रोजी एक दिवसाची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. दि. ११ जुलै रोजी बीड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने व गर्दी होणार आहे. त्यामुळे बीड शहरातील सर्व रस्ते गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बंद आहेत. तशी सूचना पोलीस अधीक्षक, यांनी दिली आहे. सदर सूचनेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानुसार बीड शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना दि. ११ जुलै गुरुवार रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.