मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेतही गदारोळ बघायला मिळाला. महत्त्वाचे म्हणजे काल ( मंगळवारी ) सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यावरून अनेक राजकीय चर्चांनाही उधाण आलं. दरम्यान, आता महाविकास आघाडीने या बैठकीत न जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
“आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही काल (मंगळवारी) भूमिका मांडली होती. एकीकडे मुख्यमंत्री मराठा समाजाशी चर्चा करतात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी चर्चा करतात. खरं तर यात गैर काहीही नाही. सरकारने दोन्ही घटकांशी चर्चा केली पाहिजे. परंतू सर्वपक्षीय बैठक बोलवत असताना, या बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची कोणतीही विरोधीपक्षाला दिली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही. त्यामुळेच आम्ही कालच्या बैठकीत न जाण्याचा निर्णय घेतला”, असं अंबादास दानवे यांनी सांगितले.