Advertisement

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शेळ्या-मेंढ्यांसह घेराव घालणार

प्रजापत्र | Sunday, 07/07/2024
बातमी शेअर करा

मराठा समाजानंतर आरक्षणासाठी राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, अशी मागणी धनगर बांधवांची आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज लढा देत आहे.आषाढी वारीपूर्वी धनगर समाजाचा  आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आषाढीच्या पूजेसाठी पंढरपुरात येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेळ्या-मेंढ्या आणि घोडे घेऊन घेराव घालण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाचे नेते अमोल कारंडे यांनी दिला आहे. धनगर समाजाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून काय पाऊले उचलली जातात, हे पाहावे लागणार आहे.

आषाढी वारीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये येतात. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. शेळ्या-मेंढ्या आणि घोडे घेऊन धनगर बांधव हे मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार आहेत. सोलापूरसह राज्याच्या विविध भागातील मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत, असे धनगर समाजाचे नेते अमोल कारंडे यांनी सांगितले.एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. आषाढी एकादशीच्या पूजेला येण्यापूर्वी आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर मात्र मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार आहे, असा इशारा कारंडे यांनी दिला आहे.धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अहिल्यादेवी होळकर महामंडळामार्फत २० लाखाचे कर्ज वाटप करावे, अशाही इतर काही मागण्या धनगर समाजाच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या आहेत.

 

धनगर समाजाचा प्रश्न काय?

देशभरातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेले आहे. मात्र, राज्यातील धनगर समाज त्यापासून वंचित आहे. देशभरातील धनगड असा उल्लेख आहे, तर महाराष्ट्रात धनगर असा उल्लेख आहे. देशभरातील समाज एकच आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे, अशी राज्यातील धनगर बांधवांची मागणी आहे.

Advertisement

Advertisement