आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हळुहळु वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. तर काही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. तसेच आजपासून भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आजपासून देवाचे राजोपचार आजपासून बंद
आज सकाळी ११ वाजता महानैवेद्यानंतर देवाचा पलंग निघाला. आषाढी सोहळ्यासाठी देवाचे सर्व राजोपचार आजपासून बंद झाले आहेत. मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. आजपासून देवाला थकवा जाणवू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावला आहे. आजपासून अशाधिव्यात्रा होईपर्यंत देव झोपण्यास जात नसल्यानं देवाचा पलंग निघणार आहे.
एका मिनीटात ३० ते ३५ भाविका विठ्ठलाचे पददर्शन घेणार
आजपासून एका मिनीटात ३० ते ३५ भाविका विठ्ठलाचे पददर्शन घेणार. तर दिवसभरात ३० ते ३५ हजार भाविकांचे पददर्शन घडवले जाते. तर एक लाखाच्या आसपास भाविकांचे दररोज मुखदर्शन होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आजपासून म्हणजे ७ जुलै ते २६ जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रक्षाळ पुजेनंतर विठ्ठल मंदिर रात्री दर्शनासाठी बंद राहणार आहे. आजपासून व्हिआयपी दर्शन बंद असणार आहे. जास्तीत जास्त सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी २४ तास दर्शन सुरु केल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.

