विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. बुलढाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रविकांत तुपकर यांनी घेतला आहे.
त्यासह लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता तुपकर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे.
रविकांत तुपकर म्हणाले, "बुलढाणा लोकसभा निवडणुकीत काही फरकानं आमचा पराभव झाला आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते बुलढाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.""बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगार आणि जळगाव या सहा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार आहोत. १३ आणि १४ जुलैला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेणार आहोत. त्या बैठकीत महाराष्ट्रात कुठे-कुठे निवडणूक लढायची याचा निर्णय होईल," असं तुपकरांनी सांगितलं.
"कुठल्याही आघाडीत जाण्याबाबत निर्णय झाला नाही. स्वतंत्रपणानं आम्ही तयारीला लागलो आहोत. प्रस्थापितांना आम्हाला शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्यायची आहे. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रीत झाल्या पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही विधानसभेच्या मैदानात उतरणार आहोत," असं तुपकरांनी म्हटलं."मी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली नाही. लोकसभा निवडणूक मी स्वतंत्र लढलो आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे बुलढाणा जिल्ह्यातील सहा मतदारसंघात आमचे उमेदवार उतवणार आहोत. तसेच, मी स्वत:हा विधानसभा निवडणूक लढणार आहे," असं तुपकरांनी स्पष्ट केलं.