Advertisement

संपादकीय अग्रलेख -बाबांचे का फावते ?

प्रजापत्र | Friday, 05/07/2024
बातमी शेअर करा

हाथरस दुर्घटनेत ज्या भोलेबाबाचा आश्रम चर्चेत आला आहे, त्या भोलेबाबावर अनेक गुन्हे दाखल आहेत. स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणवणारा हा भोलेबाबा मृतांना जिवंत करण्याची शक्ती त्याच्याकडे असल्याचे सांगायचा. त्यातूनच त्यांच्याकडची गर्दी वाढत गेली. प्रश्न कोणा एका भोलेबाबाचा नाही, प्रश्न आहे तो अप्राप्य प्राप्त करण्याच्या मानवी तृष्णेचा? एकीकडे कर्म करत जावे फळाची चिंता करू नये ही आमची संस्कृतरी असल्याचे आपण सांगतो आणि दुसरीकडे काही तरी अवघड असणारे कोणत्याही मार्गाने प्राप्त करण्यासाठीची आशा पिच्छा सोडत नाही, त्यातूनच भोलेबाबा काय किंवा आणखी कोणताही बाबा काय, त्यांचे फावत आहे.

 

     हाथरस मध्ये भोलेबाबाच्या आश्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आता देशाच्या नजर तिकडे वाळल्या आहेत. हा कथित भोलेबाबा स्वतः ईश्वराचा अवतार असल्याचे म्हणवायचा आणि म्हणून त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी एकच झुंबड उडाली आणि त्यातून सदरची चेंगराचेंगरी झाली, हे आतापर्यंत समोर आले आहे. त्याच्या सत्संगासाठी ८० हजार लोक येतील असे अपेक्षित होते, प्रत्यक्षात तो आकडा दिड लाखावर गेला आणि त्यातून मग दुर्घटना घडली असेही सांगण्यात येते. मुळात हा भोलेबाबा कोण आहे आणि त्याचे दावे कसे असतात? याबद्दल अजूनही फारसी चर्चा होताना दिसत नाही.

 

 

     या बाबावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र लोकांना अंधश्रद्धेत ढकलून बाबा स्वत: झोळी भरत होता. १९९८ मध्ये या ढोंगी बाबाला अटक झाली होती. यामध्ये त्याची पत्नी आणि इतर चार जणांचा समावेश होता. मृत मुलीला जिवंत करण्यासाठी 'जादुई शक्ती' असल्याचा दावा या बाबाने केला होता.या प्रकरणात कर्करोगाने मरण पावलेल्या 16 वर्षीय मुलीचा समावेश होता आणि बाबाने दावा केला होत की तो तिला पुन्हा जिवंत करू शकतो. 'एफआयआर'मध्ये माहितीनुसार, बाबाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 109 कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, कारण त्यांच्या अनुयायांनी स्मशानभूमीत गोंधळ घातला होता.तर असा हा बाबा, त्याला त्यावेळी देखील मृत मुलीला जिवंत करता आले नव्हतेच, तरीही २६ वर्षांनंतरही, त्याच्यामध्ये ईश्वरी शक्ती आहे, या दाव्यावर लोक विश्वास ठेवणार असतील तर लोकांच्या विवेकाला म्हणायचे तरी काय?

 

 

     प्रश्न एकट्या भोलेबाबाचा नाही, तर समाजाच्या मानसिकतेचा आहे. असे अनेक बाबा ठिकठिकाणी आजही धर्माची आड घेऊन सामान्यांना मूर्ख बनविण्याचे काम करीत आहेत. मुळात भारतीय धर्मशास्त्राने, इथल्या संस्कृतीने कायम कर्माच्या सिद्धांताला महत्व दिले आहे, कर्म करीत राहायचे, फळाची चिंता करायची नाही, कर्माचे फळ मिळतेच, हा इथल्या संस्कृतीचा पाया आहे. वेगवेगळ्या संप्रदायांनी, पंथांनी देखील हाच सिद्धांत सांगितला आहे. अगदी यापुढे जाऊन भगवद्गीता 'नशिबापेक्षा अधिक मिळणार नाही आणि नशिबात नाही ते देखील मिळणार नाही' असे सांगते आणि गीतेच्या धर्माचे पालन करणारा समाज मात्र त्याचवेळी काहीतरी अप्राप्य असलेले प्राप्त करण्यासाठी बाबा बुवांचा आसरा घेतो हे पचणारे नाही. त्यामुळे त्यावर विचार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राला आकार देण्याचे काम भागवत धर्म अर्थात वारकरी सांप्रदायाने केले. आपल्या वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, तुकाराम अगदी गाडगेबाबांपर्यंत, तुकडोजी महाराजांपर्यंत प्रत्येकानी अंधश्रद्धेवर, बुवाबाजीवर कठोर प्रहार करून सामांन्यांना कर्माचा सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक विशिष्ट कालखंडानंतर जागृतीचा प्रयत्न होत राहिला, मात्र आता हे सारे थांबले आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

 

     महाराष्ट्रात मागच्या शतकात देखील संत भगवानबाबा असतील किंवा आणखी त्याच परंपरेतील संत, त्यांनी अंधश्रदेच्या मागे न लागत स्वतःच्या कर्तृत्वावर भर देण्याचा मार्ग दाखविला, मात्र आता त्याच महाराष्ट्रात देखील परराज्यातील बाबा बुवांचे पीक वाढत आहे. अशा कोणत्याही बाबा बुवाला, आपले तत्वज्ञान म्हणजेच धर्म असे सहज सांगता येते आणि मग त्या विरोधात कोणी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला की, त्याला थेट धर्मद्रोही ठरवायला त्या बाबांचे भक्त तयारच असतात, त्यातूनच मग अंधश्रद्धेला बळ मिळते. जिथे ईशवर किंवा अवतार म्हणून ज्यांना पुजले जाते, त्यांनी कधी चमत्काराचा रस्ता दाखविला नाही, युद्ध कृष्णाला टाळता आले नाही, रामाला वनवास चुकला नाही, हे धर्माचे तत्वज्ञान असताना कोणीतरी स्वतःला यशावर म्हणवतो आणि सामान्य जनता त्याच्या मागे धावते हे *टहंबवायचे* असेल तर ज्यांना म्हणून आपल्याला धर्माची काळजी आहे असे वाटते, आपल्याला समाजाची काळजी आहे आहे असे वाटते, त्यांनी चमत्कारापलीकडचा धर्म समाजाला सांगितलं पाहिजे. वारकरी संप्रदाय असेल किंवा स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या चळवळी, त्यांनी धर्मचिकीत्सेपेक्षाही खरा धर्म काय आहे याबाबत जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, जोपर्यंत हे होणार नाही, तोपर्यंत बाबा बुवांची फक्त नावे बदलतील, भोंदूगिरी थांबणार नाही.

 

 

Advertisement

Advertisement