Advertisement

मविआचा विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न

प्रजापत्र | Wednesday, 26/06/2024
बातमी शेअर करा

 मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात ३० जागा जिंकून महायुतीला घाम फोडणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. लोकसभेत 'इंडिया' आघाडीनं वापरलेला पॅटर्न राज्यात रिपीट करण्यात येईल. महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक एकत्र लढतील. पण मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा देण्यात येणार नाही. मुख्यमंत्रिपदाबद्दलचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेण्यात येईल.

 

विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. पण आमच्याकडे नरेंद्र मोदींच्या रुपात आश्वासक चेहरा आहे. विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, अशी विचारणा भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार करण्यात आली. पण इंडिया आघाडीनं पंतप्रधानपदाचा चेहरा दिला नाही. पण याचा फायदा इंडिया आघाडीला झाला. लोकसभेत आघाडीला चांगलं यश मिळालं. आता त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल.महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात जागावाटपावर चर्चा होईल. मविआतील तीन पक्ष प्रत्येकी ९६ जागा लढणार आहेत. विधानसभेत तिन्ही पक्ष समान जागा लढतील. मविआ मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही. विधानसभेत तिन्ही पक्षांना मिळणाऱ्या जागा पाहून मुख्यमंत्रिपदाबद्दलचा निर्णय घेतला जाईल.

 

लोकसभेत महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. ठाकरेसेनेनं ९ जागांवर विजय मिळवला. शरद पवारांच्या पक्षानं ८ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्क्याचा विचार केल्यास २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १५० हून अधिक मतदारसंघात विरोधकांना आघाडी मिळाली. ही सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Advertisement

Advertisement