Advertisement

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचे दुसरे वर्षे

प्रजापत्र | Sunday, 23/06/2024
बातमी शेअर करा

बीड : 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचे हे दुसरे वर्षे आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील एक हजार दिंड्यांमधील १२ लाख ४१ हजार वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक पाच किलो मीटर अंतरावर एक हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तयार केला आहे. ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी हे वारकऱ्यांच्या सेवेत राहणार असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

 

आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या काेणाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत असतात. काही जण दिंड्यांमध्ये सहभागी होतात. यावेळीही आतापर्यंत शेगावची श्री संत गजानन महाराज, अमरावतीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जळगावची श्री संत मुक्ताबाई आणि नाशिकची श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. यासह राज्यातील इतरही मोठ्या असणाऱ्या दिंड्या २६ जूनपासून मार्गस्थ होणार आहेत. यातील वारकऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवली तरी तातडीने सेवा देता यावी, यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण नियोजन केले आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून दोन दिवसांत पंढरपूर येथे बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

 

 

पालखी मुक्कामी आयसीयू

ज्या ठिकाणी पालखी किंवा दिंडी मुक्कामी राहणार आहे, अशा ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केले जाणार आहे. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर असतील.

चार ठिकाणी महा आरोग्य शिबिर- पंढरपूरमध्ये गेल्यावर महाआरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. येथे विशेष तज्ज्ञांसह ३ हजार ३६२ डॉक्टर, कर्मचारी सेवा देणार आहेत. २०२३ मध्ये वारकऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून ७७ हजार ८५४ रूग्णांना चष्म्याचे मोफत वाटप केेले होते. सोबत इतरही सेवा दिल्या होत्या.

 

Advertisement

Advertisement