दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी संपायचे नाव घेत नाहीयेत. कथित दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळून सुद्धा त्यांना तुरूंगामध्येच राहावे लागणार आहे. राऊस ऐव्हेन्यू कोर्टाने गुरूवारी म्हणजेच २० जूनला अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण कोर्टाच्या या निर्णयाला विरोध करत ईडीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. यावेळी हायकोर्टाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
दिल्ली दारु घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने गुरूवारी जामीन मंजूर केला होता. पण ईडीने कोर्टाच्या या निर्णयाला आक्षेप घेत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळून देखील तुरूंगातच राहावे लागणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना धक्का बसलाय.
ईडीच्या याचिकेवर निकाल येईपर्यंत केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. यासोबतच ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या ईडीच्या याचिकेवर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. ईडीच्या याचिकेवर दोन ते तीन दिवसांत निर्णय देणार असल्याचे दिल्ली हायकोर्टाने सांगितले. हायकोर्टाने वकिलांना सोमवारपर्यंत लेखी युक्तिवाद करण्यास सांगितले आहे.
एएसजी एस व्ही राजू ईडीच्या वतीने युक्तिवाद करत आहेत. तर अभिषेक मनू सिंघवी आणि विक्रम चौधरी हे अरविंद केजरीवाल यांच्या वतीने युक्तिवाद करत आहेत. न्यायमूर्ती सुधीर जैन आणि न्यायमूर्ती रविंदर दुडेजा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. ईडीचे वकील एसव्ही राजू म्हणाले की, 'आम्हाला युक्तिवाद करण्याची संधी मिळाली नाही.' यावर केजरीवाल यांचे वकील म्हणाले, 'तुम्ही काल ७ तास तुमचे म्हणणे मांडले. काही गोष्टी कृपापूर्वक स्वीकारल्या पाहिजेत.'
दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. म्हणजेच हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत केजरीवाल यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल जवळपास ६० दिवस तिहार तुरुंगात होते. १० मे रोजी सुप्रीम कोर्टाने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करून पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे सांगितले होते. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे केजरीवाल १ जूनला तिहार तुरूंगात परत गेले होते.