Advertisement

 एखाद्या शाश्वत व्यवस्थेत कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर सलोखा बिघडतो

प्रजापत्र | Thursday, 20/06/2024
बातमी शेअर करा

जालना- एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अशा शाश्वत झालेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिकदृष्टीने असलेला सलोखा बिघडत जातो. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे ताट हे वेगळे असले पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी जालन्यातील वडीगोद्री येथे जाऊन ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

 

भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे नेत्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळं असलं पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

 

 

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील, अशी माझी धारणा आहे. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावरती ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगेसोयरे शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. सगेसोयरे शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Advertisement

Advertisement