जालना - अंतरवली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरूय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे. तसेच समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या , लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी जालना -वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची हाकेंची मागणी आहे. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड दाखल झाले आहेत.