बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांनी आज अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी ३ पर्यंत इतर कोणीही उमेदवारी अर्ज न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत हायव्होल्टेज सामना रंगला होता. मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आलं होतं. सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात होत्या. पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावरच विश्वास टाकत त्यांना तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने विजयी केले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले. मात्र राष्ट्रवादीतील इतर नेतेही या जागेसाठी इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सस्पेन्स होता. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज हा सस्पेन्स संपला आणि राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं.
दरम्यान, विधिमंडळात महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने राज्यसभेच्या या जागेसाठी महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज दाखल करणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता खरी ठरली आणि सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीचा मार्ग सुकर झाला.