वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत गुण वाढवून दिलेल्या अर्थात ग्रेस मार्क्स मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. या परीक्षेची तारीख NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी आदेश दिल्यानंतर एनटीएनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
'या' दिवशी होणार फेरपरीक्षा
एनटीएनं यासंदर्भात माहिती देणारं ट्विट केलं आहे. यामध्ये म्हटलं की, एनटीएच्या उच्चस्तरीय समितीनं ज्या १५६३ विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेले गुण अर्थात ग्रेस मार्क्स मागे घेण्यात येणार असल्याचा अहवाल दिला होता. यावर सुप्रीम कोर्टानं जे निरिक्षण नोंदवलं आहे. त्याला अनुसरुन या सर्व ग्रेस मार्क्स दिलेल्या १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २३ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांशी साधणार संपर्क
यासंदर्भात एनटीए लवकरच एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करणार आहे. तसेच या सर्व १५६३ विद्यार्थ्यांशी अधिकृत संवाद साधला गेला आहे, याची नोंद राहावी म्हणून त्यांना ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात येईल, असंही एनटीएन आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.