बीड - जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या १९ वर्षीय तरुणीने महिला वार्डातील स्वच्छतागृहात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली तर जरूड (ता. बीड) येथे २२ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या दोन्ही घटनेने बीड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्वाती मुकुंद धनवे (वय १९ वर्ष) रा. नेकनूर (ता.बीड), रामेश्वर कल्याण काकडे (वय २२) रा. जरुड (ता. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुण, तरुणीचे नाव आहे. स्वाती धनवे हीस बुधवारी रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिला वार्डात तिच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी आज सकाळी ती तोंड धुण्यासाठी म्हणून वार्डातील स्वच्छतागृहात गेली. परंतु बराच वेळ झाला तरी बाहेर येत नसल्याने आणि आवाज दिला तरी प्रतिसाद देत नसल्याने मनात संशय आला आणि मयतेच्या भावाने स्वच्छतागृहाच्या वरून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानेच आत उतरून गळ्याचा फास काढून पलंगावर आणून टाकले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तीचा मृत्यु झाला होता. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा सुरू आहे.
जरुड (ता. बीड) येथील तरुण रामेश्वर कल्याण काकडे हा रात्रीपासून घरी गेलेला नव्हता सकाळी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. रामेश्वर काकडे याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.