अहमदनगर - सहा महिन्यापूर्वी हिंदू धर्माची ओढ लागलेल्या अहमदनगरमधल्या जमीर शेख आणि त्याच्या कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला होता. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात या कुटुंबाने धर्मांतर केले. मात्र आता त्यांच्या ८ वर्षीय मुलीला गंभीर आजारातून वाचवण्यासाठी कुणीच पुढं येत नसल्याने हे कुटुंब पुन्हा मुस्लीम धर्मात प्रवेश करण्याचा विचार करत आहे.
जमीर शेख याचे हिंदू धर्मात शिवराम आर्य असं नाव करण्यात आलं होतं. या शिवराम यांची ८ वर्षाची मुलगी हिच्या मेंदूत गाठ आहे. त्यामुळे तिच्या ऑपरेशनसाठी ५ लाखाच्या आसपास खर्च येणार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीचा वैद्यकीय खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. याबाबत शिवराम आर्य सांगतात की, मुलीच्या उपचारासाठी मी बऱ्याच जणांकडे मदतीची विनंती केली, हिंदू झाल्यामुळे अनेकांनी नातेवाईकांनी माझ्याशी नाते तोडले परंतु हिंदू धर्मातील दानशूर माझ्या मुलीच्या उपाचारासाठी धावून येतील अशी अपेक्षा होती. परंतु कुणीही मदत करत नाही. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी जर मी माझा धर्म पुन्हा स्वीकारला तर आमचे लोक मला मदत करतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मुलीच्या डोक्यात गाठ आहे. तिला २ ऑपरेशन करायचे आहेत. हिंदू झाल्यानंतर माझे शिवराम आर्य असं पॅनकार्ड, आधारकार्ड झालं. पत्नीचेही नाव बदललं. परंतु काही कागदपत्रावर मुस्लीम नाव आणि आधार कार्डवर हिंदू नाव यामुळे शासकीय मदत मिळण्यात अडचण होतेय. मुलीच्या आरोग्याचं संकट अचानक आमच्यावर आले. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही. हिंदू सनातन धर्मातील उद्योगपती अन्य मंडळी माझ्या मुलीच्या उपचारासाठी धावतील असं वाटलं होतं. परंतु मी बरेच जणांना फोन केले कुणी मदतीला आलं नाही असं शिवराम आर्य यांनी सांगितले.
दरम्यान, माध्यमांमुळे जर माझ्या मदतीला कुणी आलं धर्मांतर करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझ्या मुलीच्या उपचारासाठी दानशूरांनी पुढे यावं, मी चुकीचा निर्णय घेतला नाही असं मला वाटेल. जर मदतीला कुणी आलं नाही तर मजबुरीने मला मुस्लीम धर्मात प्रवेश करावा लागेल. त्यानंतर माझ्या नात्यागोत्यातील माझे भाऊ आणि अन्य नातेवाईक मदत करतील अशी अपेक्षा आहे असंही शिवराम आर्य यांनी सांगितले आहे.